श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
दूध भेसळीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण केला आहे. तालुक्यातील अनेक दूध संकलन केंद्रांवर दुधामध्ये भेसळ करण्यात येत आहे. दूध उत्पादन वाढवण्यासाठी काही स्वार्थी लोक रासायनिक पदार्थ आणि इतर अशुद्ध घटक दुधामध्ये मिसळत आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नवीन स्थापन झालेल्या महायुती सरकारने राज्यातील दूध भेसळ 100 टक्के बंद करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.
दूध भेसळ ही फक्त आर्थिक फसवणूक नसून, ती लोकांच्या जीवनाशी संबंधित एक गंभीर मुद्दा बनला आहे. सध्या लोकांना मिळणारे दूध हे शुद्ध असत नाही. शेतकर्यांच्या कष्टाची कदर न करता, भेसळ करणारे काही लोक याला आपल्या नफ्याचे साधन बनवत आहेत. यामुळे दूध विकत घेत असलेले नागरिक, विशेषत: लहान मुले आणि वृद्ध यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दूध भेसळ करणार्यांमुळे शेतकर्यांचेही नुकसान होत आहे. भेसळ बंद झाल्यास शेतकर्यांच्या दुधाला किमान 50-70 रुपये प्रति लिटर भाव मिळवू शकतो, परंतु भेसळ करणार्यांमुळे त्यांचे कष्ट आणि मेहनत फोल जात आहे. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक स्तर सुधारण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नवीन स्थापन झालेल्या महायुती सरकारने राज्यातील दूध भेसळ 100 टक्के बंद करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.
दूध भेसळ थांबविण्याचे काम एकटे सरकारचे नसून सामान्य नागरिकांनीही एकजूट दाखविली पाहिजे. दुधातील भेसळ थांबली नाही तर आरोग्याच्यादृष्टीने भयानक परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या कष्टाची योग्य किंमत मिळवण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य वाचवण्यासाठी या भेसळीविरोधी लढ्याला समर्थन देणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करून प्रशासन अस्तित्वात आहे, याचा पुरावा द्यावा.
यासाठी हे केले पाहीजे
– दूध भेसळ करणार्या व्यक्तींची सखोल चौकशी केल्याची माहिती मिळाली.
– ग्रामीण भागातील प्रत्येक दूध संकलन केंद्राची आठवड्यातून एकदा तपासणी व्हावी.
– यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींविरुध्द कडक कारवाई करावी.
– भेसळखोरांना कठोर शिक्षा दिल्यास दूध उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळेल.
– दूध विकणार्या नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी शुद्ध दूधच उपलब्ध करावे.