Sunday, June 14, 2026
HomeनगरAMC Election : शिवसेनेचा गड की भाजप-राष्ट्रवादीची मुसंडी?

AMC Election : शिवसेनेचा गड की भाजप-राष्ट्रवादीची मुसंडी?

महापालिका रणधुमाळी || मध्यवर्ती शहरात अटीतटीची लढत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगरच्या मध्यवर्ती शहराचा भाग हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात शिवसेनेला सोबत घेऊनच यापूर्वी भाजपला काही प्रमाणात यश मिळाले होते. मात्र शिवसेना वगळता अन्य पक्षांना या भागात फारसे स्थान मिळाले नव्हते. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपने मध्यवर्ती शहरातील काही प्रभागांमध्ये नवखे तसेच मातब्बर उमेदवार उतरवल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

- Advertisement -

प्रभाग क्रमांक 9, 10, 11, 12 व 15 या पाच प्रभागांमध्ये भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत सुरू आहे. त्यामुळे या प्रभागांकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप वरचढ ठरणार की शिवसेना शिंदे गट आपला गड राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या पाचही प्रभागांमध्ये आजवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले असून, याच प्रभागांच्या जोरावर शिवसेना शहरात नेहमीच संख्याबळात आघाडीवर राहिली आहे. उपनगरांमध्ये भाजप व राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक असले, तरी शहरातील मतदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरली आहे. त्यामुळेच यंदा शिवसेना शिंदे गटाने या प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

भाजप-राष्ट्रवादी युतीत काही प्रभागांमध्ये भाजपचे तीन व राष्ट्रवादीचा एक उमेदवार, तर काही ठिकाणी प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत युती विरूध्द शिवसेना शिंदे गट अशी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 9, 12 व 15 या तीन प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मातब्बर नेते थेट निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या नेत्यांसाठी ही निवडणूक केवळ विजयाची नव्हे, तर अस्तित्वाची लढाई ठरली आहे. या प्रभागांमध्ये शिंदे गटाचे नेते व उमेदवार जीवाचे रान करून प्रचारात उतरले असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. ही निवडणूक त्यांच्यासाठी ‘जिंकायचेच’ आव्हान बनली आहे.

ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी घेतली रोहित पवारांची भेट; आंदोलन...

0
पंढरपूर । Pandharpur शेतकरी कर्जमाफीच्या अटींवरून राज्यातील राजकारण आणि शेतकरी चळवळींमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली असली, तरी...