मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांना पक्षाने शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद तीव्र झाले आहेत.
काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी सोबत लढवली. या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या २४ जागांवर विजय मिळवता आला. भाजप महायुती आणि ठाकरे बंधूंच्या युतीत मुंबईत काँग्रेसची डाळ शिजली नाही. पक्षाच्या या निराशाजनक कामगिरींचे खापर वर्षा गायकवाड यांच्यावर फोडत त्यांच्या मुंबई अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
निवडणूक निकाल येण्यास २४ तास उलटण्याआधीच भाई जगताप जाहीरपणे गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची जाहीरपणे मागणी करून आपण पक्ष शिस्तीचा भंग केला आहे. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात आपण लेखी खुलासा करावा. विहित मुदतीत आपला समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे काँग्रेसचे सचिव आणि मुंबई प्रभारी यू. व्ही. व्यंकटेश यांनी पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे.




