Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यादिव्यांगांसह निराधार महिलांचे ठिय्या आंदोलन

दिव्यांगांसह निराधार महिलांचे ठिय्या आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

येथील प्रांत व तहसील कार्यालयाकडून शहरासह तालुक्यातील दिव्यांगांसह विधवा व ज्येष्ठ नागरिकांची सातत्याने हेळसांड केली जाऊन समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिक, महिला लाभार्थ्यांनी अपंग जनता दल संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालय प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन छेडत आपला रोष व्यक्त केला. पालकमंत्री शहराचे असतानादेखील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांतर्फे केला गेला.

- Advertisement -

तालुक्यात तीनशेच्या वर दिव्यांग लाभार्थी असून अंध, अपंग, विधवा व ज्येष्ठ लाभार्थ्यांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. मात्र प्रांत व तहसील कार्यालयातील अधिकारी आमच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. साधे प्रांत कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारदेखील गत अनेक महिन्यांपासून बंदच ठेवण्यात आले आहे. लहान प्रवेशद्वारातून जाताना दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याबाबत अनेकदा तक्रारी करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजता दिव्यांग विधवा महिला तसेच ज्येष्ठ लाभार्थ्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला.

ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना शासनातर्फे नाममात्र मानधन दिले जाते. मात्र तेदेखील सहा ते सात महिने लाभार्थ्यांच्या पदरी पडत नसल्याने अनेक लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काहींना तर अक्षरश: भिक मागून आपले जीवन जगावे लागत आहे. अंत्योदय योजनेमार्फत शिधापत्रिका असूनदेखील धान्य दिले जात नाही. पॉस मशीनवर थम्ब उमटत नसल्याने रेशन दुकानदार धान्य देत नाही. काही दुकानदार फक्त पाच किलो धान्य देतात. या धान्यात आम्ही महिनाभर गुजराण कशी करावी? असा प्रश्न ठाकरे यांच्यासह आंदोलनकर्त्या निराधार महिलांनी यावेळी करत आपल्या व्यथा मांडल्या.

प्रांत कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार अनेक महिन्यांपासून बंद आहे. कामानिमित्त येणार्‍या दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांना लहान दरवाजातून यावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. दिव्यांगांसाठी व्हीलरॅम्प नसल्याने कार्यालयात जायचे कसे? असा प्रश्न पडतो. अक्षरश: जमिनीवर सरपटत मध्ये जावे लागते. या सर्व समस्यांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने निवेदने, अर्ज देण्यात आले. मात्र अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळेच प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करावे लागल्याची खंत ठाकरे यांच्यासह दिव्यांगांनी व्यक्त केली.

तब्बल तीन तासांनंतर या आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार खरे यांनी आंदोलकांची भेट घेत येत्या आठ दिवसांत दिव्यांगांच्या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. या समस्या न सुटल्यास संपूर्ण तालुक्यातील दिव्यांग प्रांत कार्यालयावर पुन्हा ठिय्या मांडतील, असा इशारा ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला. या आंदोलनात मयूर पाटील, अरुण खैरनार, समाधान बच्छाव, तालुका महिला आघाडीच्या मनीषा सपकाळ, लीना मोरे, योगिता पाटील, नरेंद्र खैरनार, भरत राऊत आदींसह दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या