अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सरकारी योजनांची प्रभावी माहिती पुरविण्यासाठी कृषि विभागाने जिल्ह्यासाठीचे व्हॉटसअॅप चॅनेल सुरू केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते या व्हॉटसअँप चॅनलचे विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, कृषी उपसंचालक सागर गायकवाड व विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकर्यांना कृषी विभाग या व्हॉटसअॅप चॅनेलच्या माध्यमातून कृषी विषयक योजनांची माहिती एका क्लिकवर मिळू शकेल.
तसेच जिल्ह्यात उत्पादित होणार्या प्रमुख पिकावर प्रक्रिया उद्योग उभारणी करणे, शेतमाल बाजारभाव मिळविणे या कामी व्हॉटसअॅप चॅनल महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तहसिल व गट विकास अधिकारी कार्यालय येथे शेतकर्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असलेल्या ठिकाणी चॅनेलच्या क्यूआर कोडला व्यापकस्तरावर प्रसिद्धी देण्यात यावी व व्हॉटसअॅप चॅनेलला जास्तीत जास्त वापरकर्ते (फॉलोवर्स) मिळतील यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. आशिय यांनी कृषी विभागाला यावेळी दिल्या.
या चॅनलमार्फतर शेतीतील नवीन तंत्रज्ञान, उन्नत बियाणे, पाणी व्यवस्थापन, अधिक उत्पादनासाठी स्मार्ट तंत्र, केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांद्वारे मिळणारे आर्थिक सहाय्य, कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीतील मूल्यवर्धनाच्या संधी, शेतीमालाच्या मार्केटिंगसाठी मार्गदर्शन यासारखे फायदे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना करून दिले जाणार असल्याचे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.