अहमदाबाद | Ahmedabad
गुजरातमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन झाले. हा अपघात इतका भयंकर होता की, विमानातील प्रवाशांचे मृतदेह ओळखणेही कठीण होते. त्यामुळे पीडितांच्या कुटुंबाला डीएनए नमुने देण्यासाठी हॉस्पिटलला बोलावले होते. रविवारी सकाळपर्यंत २४८ मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले. त्यापैकी ३१ मृतदेह जुळले आहेत, त्यापैकी २० मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. त्यांचे मृत्यु प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे.
रुग्णवाहिकांद्वारे मृतदेह सुरक्षिततेसह ज्यांच्या त्यांच्या गावी नेले जात आहेत. यासाठी २३० पथके तयार करण्यात आली आहेत, जी मृतांच्या कुटुंबियांशी थेट संपर्कात आहेत. १९२ रुग्णवाहिका आणि वाहने सज्ज ठेवण्यात आली आहे. अपघातात प्राण गमावलेल्या ११ परदेशी नागरिकांचे कुटुंबीय आज अहमदाबादला पोहोचू शकतात. मृतदेह ठेवण्यासाठी १७० शवपेट्या बनवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यापैकी सुमारे १०० शवपेट्या वडोदराहून अहमदाबादला पोहोचवण्यात आल्या आहे. उर्वरित शवपेट्या बनवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, आज सकाळी काही मृतदेहांचे डीएनए रिपोर्ट जुळले असून त्यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाशी डीएनए नमुने जुळले आहे. गृहमंत्री हरश संघवी यांनी ही माहिती दिली. आज संध्याकाळी विजय रुपाणी यांचा मृतदेह कुटुंबाला सोपवला जाणार आहे. आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितले आहे की, विजय रुपाणी यांचे राजकोटमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पीडित कुटुंबातील सदस्यांचीही भेट घेतली.
#WATCH | #AhmedabadPlaneCrash | Gujarat Home Minister Harsh Sanghvi says "Former Gujarat CM Vijay Rupani lost his life during the Air India crash in Ahmedabad on 12th June. Today, at around 11:10 AM, his DNA has matched. He worked for the people of the state for several years…" pic.twitter.com/4QYqOh2Eti
— ANI (@ANI) June 15, 2025
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी एअर इंडियाच्या त्याच फ्लाईटमधून प्रवास करत होते जे अहमदाबादहून लंडनला चालले होते. रुपाणी लंडनला मुलाकडे जात होते परंतु त्यांचे विमान टेकऑफ घेताच काही मिनिटांतच खाली कोसळले. या विमानात २४२ लोक होते. त्यातील २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकमेव प्रवासी सुखरूप बचावला. या दुर्घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी म्हणाले की, २५० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम रात्रंदिवस काम करत आहे. अपघातानंतर जखमींना प्रथमोपचार देण्यात आले आणि मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली. डॉ. जोशी म्हणाले की, काही मृतदेह जास्त जळाल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. डीएनएद्वारे मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे.
दरम्यान, अहमदाबादमधील विमान अपघातात आतापर्यंत २७० जणांनी आपला जीव गमावला आहे. विमानात एकूण २४२ जण होते, ज्यात २३० प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि दोन पायलट होते. या अपघातात एक प्रवासी सोडला तर विमानातील बाकी सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचे विमान विमानतळा जवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले. ज्यात केवळ विमानातील लोकच नाहीत तर इमारतीतील अनेक डॉक्टर्स, विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




