अहिल्यानगर (प्रतिनिधी)
रासायनिक खत कंपन्यांकडून आवश्यक खतासोबत इतर अनावश्यक खते, औषधे लिंकींगची सक्ती केली जात असल्याने खत दुकानदार, शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दरम्यान, लिंकींगची सक्ती करणार्या कंपन्या, घाऊक व किरकोळ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. संबंधीत कंपन्यासंदर्भात ठोस पुरावे आढळल्यास कारवाईबाबतचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला जाईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिला आहे.
सध्या रब्बी हंगाम चालू असल्यामुळे खताची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र खत कंपन्या खतांसोबत लिंकींगची सक्ती करत आहेत. शेतकर्यांना आवश्यक असलेल्या खतांसोबत इतर अनावश्यक खते, औषधे दिली जात आहे. सदर खते, औषधांची आवश्यकता नसतानाही खत दुकानदारांना खरेदी करण्याची सक्ती कंपन्याकडून केली जात आहे.
एखाद्या खत विक्रेत्याने अनावश्यक खते, औषधे घेण्यास नकार दिल्यास संबंधित दुकानदारास आवश्यक तो खतपुरवठा केला जात नाही. जाणीवपूर्वक त्यांची अडवणूक केली जाते. त्यामुळे त्यांना ते घ्यावे लागते. खत दुकानदार ते खते, औषधे शेतकर्यांच्या माथी मारतात. याचा आर्थिक भुर्दंड शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.
खत कंपन्यांकडून होत असलेल्या लिंकींग सक्तीला आळा घालण्यासाठी खत पुरवठादार असोसिएशनच्या यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठका झाल्या आहेत. केंद्र सरकारने संबंधीत कंपन्यांना पत्रव्यवहार करून लिंकींग न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही त्यांच्याकडून लिंकींग केले जात आहे. असा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात सर्रास सुरू असून याला खत दुकानदारांसह शेतकरी वैतागले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कंपन्यांकडून अनावश्यक खते, औषधांची सक्ती केली जात असेल व तसे पुरावे हाती आले तर संबंधीत कंपनीविरोधात कारवाई करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवू, प्रस्ताव गेल्यानंतर संबंधीत कंपनीवर कारवाई होईल. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील घाऊक व्यापारी, किरकोळ विक्रेते यांच्याकडून लिंकींगची सक्ती होत असेल आणि तशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधीतांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.