अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भविष्यात अहिल्यानगर शहरातील वाढत्या वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर शहरात मेट्रो ट्रेनची अत्यंत गरज आहे. आतापासूनच या दृष्टीने योग्य नियोजन आणि पाठपुरावा केला, तर येत्या काही दशकात शहरात मेट्रो धावू शकते, असा विश्वास आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
सार्वमत व नगर टाईम्सच्या अहिल्यानगर एमआयडीसी कार्यालयात आरतीनंतर संपादक अनंत पाटील यांच्यासह श्रीराम जोशी, ज्ञानेश दुधाडेे, सचिन दसपुते यांच्यासह झालेल्या चर्चेदरम्यान आ. जगताप यांनी शहराच्या विकासाचे व्हिजन मांडले. यावेळी नगर शहराच्या विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम रस्त्यांचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे विणताना रस्त्यांची उंची वाढू दिली नाही; पूर्ण रस्ते खोदून जुने डांबरीकरण काढून नवे रस्ते केले गेले. अन्यथा त्याचा परिणाम शहरातील जुन्या व नव्या बांधकामांवर झाला असता आणि ही बांधकामे रस्त्यापेक्षा खाली गेली असती. हे रस्ते बांधताना जाणीवपूर्वक त्यांच्या दर्जाकडे लक्ष देण्यात आल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.
नगर शहरातील उड्डाणपुलामुळे अनेक ठिकाणी रस्ते रुंद झाले असून आता नगरकरांची देखील बदलाची मानसिकता तयार झाली असल्याचे आ. जगताप यांनी आवर्जून सांगितले. शहरातील सर्वसामान्यांच्या महत्त्वाचा विषय असणार्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्यात आला असून, नव्याने बुरुडगाव रोडला मनपाचे भव्य रुग्णालय होत आहे. याचा मोठा फायदा नगरकरांना होणार आहे. भविष्यात शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रोची गरज असून, त्या दृष्टीने आतापासून विचार आणि प्रयत्न झाल्यास काही दशकात नगरकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सचिनभाऊ जिल्हा बँकेच्या रिंगणात
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिनभाऊ जगताप हे जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार आहेत. जिल्हा बँकेत काही अपवाद वगळता जवळपास ही निवडणूक बिनविरोध होण्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तारकपूर-सावेडी वाहतूक प्रश्न सोडवणार
नगर शहरातील एसटी महामंडळाचे मध्यवर्ती बसस्थानक असणार्या तारकपूरवरून सावेडी, पाईपलाईन रोड व तपोवन रोडकडे जाणार्या प्रवाशांसाठी नगर शहर रिक्षा संघटनेशी बोलून शहर रिक्षाद्वारे दळणवळण सुविधा वाढवण्यासोबतच या भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडवणार असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.




