Wednesday, November 18, 2026
HomeनगरAhilyanagar : सेवा सोसायटी मतदारसंघात आघाडी; उर्वरित 7 मतदारसंघांत बिघाडी?

Ahilyanagar : सेवा सोसायटी मतदारसंघात आघाडी; उर्वरित 7 मतदारसंघांत बिघाडी?

जिल्हा बँक निवडणुकीत विखे-थोरातांच्या संभाव्य आघाडीकडे राज्याचे लक्ष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून लवकरच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, बँकेच्या 21 संचालक जागांपैकी सेवा सोसायटी मतदारसंघातील बहुतांश उमेदवार निश्चित मानले जात आहेत. यासाठी संबंधित तालुक्यांतील सेवा सोसायट्यांच्या मतदारांचे ठराव स्थानिक नेत्यांनी ताब्यात ठेवले आहेत. बहुतांश ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये सहमती झाली असली, तरी खरी लढत उर्वरित मतदारसंघांमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत. या ठिकाणी जिल्ह्यातील दिग्गज नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संभाव्य राजकीय आघाडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांपैकी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अवघ्या 4 जागांवर प्रत्यक्ष मतदान झाले होते. उर्वरित जागा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत बिनविरोध काढल्या होत्या. गेल्या वेळी विखे पाटील यांच्याविरोधात बाळासाहेब थोरात यांचे पॅनल मैदानात होते. थोरातांच्या पॅनलमध्ये भाजपमधील माजी आ. शिवाजीराव कर्डिले, विवेक कोल्हे आणि जामखेडचे अमोल राळेभात यांचा समावेश होता. यंदा मात्र राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. बँकेवर गेल्या काही वर्षांपासून विखे पाटील व भाजपच्या माध्यमातून कर्डिले यांचे वर्चस्व राहिले. कर्डिले यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली असली, तरी अप्रत्यक्षपणे बँकेवर विखे आणि भाजपचाच प्रभाव दिसून आला.

विखे-थोरात एकत्र येण्याच्या चर्चा
यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विखे विरुद्ध थोरात असा सामना रंगणार असे वाटत असतानाच, सहकाराच्या या राजकारणात दोन्ही नेते एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दुसरीकडे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून तिसरे स्वतंत्र पॅनल उभे केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू असतानाच, सेवा संस्थांच्या 14 पैकी 10 जागांवर नेत्यांमध्ये सहमती झाल्याचे समजते. मात्र, सेवा संस्थांच्या उरलेल्या 4 आणि इतर 7 अशा एकूण 11 जागांवर अजूनही पेच कायम आहे. यामध्ये महिलांसाठीच्या 2 जागा, बिगर शेती मतदारसंघ (1), शेतीपूरक मतदारसंघ (1) तसेच अनुसूचित जाती/जमाती , भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय (जइउ) प्रत्येकी 1 अशा 3 राखीव जागांवर एकमत झालेले नाही. त्यामुळे या जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

श्रीगोंद्यासह पारनेर, अकोले, कर्जतमध्ये पेच
सेवा सोसायटी मतदारसंघातून श्रीगोंदा, पारनेर, अकोले आणि कर्जत या तालुक्यांमधील उमेदवारीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या ठिकाणाहून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंच्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेत्यांची अडचण झाली आहे. उर्वरित मतदारसंघांतील उमेदवार अंतिम करताना नेत्यांची मोठी कसरत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवरील खोट्या आरोपांचा तिन्ही पक्ष एकवटून मुकाबला...

0
मुंबई | Mumbai दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत...