अहिल्यानगर (प्रतिनिधी)
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत 10 हजार 599 मतदारांची नावे एकापेक्षा अधिक वेळा समोर आल्याचे निदर्शनास आले आहे. अशा संभाव्य दुबार नोंदींसमोरील (*) या विशेष चिन्हाच्या आधारे महानगरपालिका प्रशासनाने व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे.
मतदारांची नावे, लिंग, पत्ता आणि छायाचित्र यांची प्राथमिक तुलना करून त्यांत साम्य असल्यास संबंधित मतदाराशी थेट संपर्क साधण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पडताळणीव्दारे तीच व्यक्ती आहे किंवा नाव समान असले तरी वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, याची खात्री केली जाईल. तपासणीत एखादी व्यक्तीच एकापेक्षा जास्त मतदान केंद्रांमध्ये नोंदली गेल्याचे निश्चित झाल्यास, त्या मतदाराकडून तो प्रत्यक्षात कोणत्या प्रभागातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहे याबाबतचा अर्ज घेण्यात येईल. तपास अधिकार्याची खात्री झाल्यानंतर संबंधित मतदाराचे मतदान केंद्र त्याच्या निवडीप्रमाणे निश्चित केले जाईल. यानंतर इतर सर्व प्रभागांमधील त्याच्या नावासमोर दुबार मतदार, प्रभाग क्रमांक, मतदार क्रमांक अशी स्पष्ट नोंद करण्यात येणार आहे. अशा नोंदी केलेल्या मतदाराला फक्त निवडलेल्या प्रभागातील मतदान केंद्रावरच मतदानाचा अधिकार राहील.
इलेक्ट्रॉनिक व कागदी स्वरूपातील दोन्ही मतदार याद्यांमध्ये झालेल्या त्रुटींची दुरूस्ती करून अचूक व शुध्द अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे हा महानगरपालिकेचा उद्देश असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. नागरिकांनीही आपल्या नावातील त्रुटी, दुबार नोंदी किंवा आवश्यक सुधारणा असल्यास निश्चित मुदतीत महानगरपालिकेकडे हरकती व सूचना दाखल कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. महानगरपालिकेच्या या तपासणी मोहिमेमुळे आगामी निवडणुका पारदर्शक व अचूक मतदार यादीवर आधारित राहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रतिसाद न मिळाल्यासही नोंद होणार
ज्या मतदारांकडून संपर्क साधूनही प्रतिसाद मिळणार नाही, अशा सर्व नोंदींवर दुबार मतदार अशी नोंद केली जाईल. नंतर अशा व्यक्तीने मतदान केंद्रावर प्रत्यक्ष येऊन मतदान करायचे असल्यास, त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केलेले नाही याबाबत हमीपत्र घेण्यात येईल. काटेकोर ओळख पटविल्यानंतरच त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली जाईल.




