Tuesday, February 3, 2026
HomeनगरAhilyanagar News : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी

अहिल्यानगर । प्रतिनिधी

तुम्ही ज्या कार्यालयात आहात, त्या ठिकाणी बॉम्ब बसविण्यात आला आहे, असा मजकूर असलेला मेल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मेलवर शुक्रवारी (30 जानेवारी) दुपारी 12:43 वाजता प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

दरम्यान, सदर मेल परदेशी भाषेत असून त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा थेट उल्लेख नसून, युक्रेनमधील 10 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा मेल परदेशातून पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली.

YouTube video player

या संदर्भात माहिती देताना निवासी जिल्हाधिकारी गीते यांनी सांगितले की, संबंधित मेल चुकून जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या मेल आयडीवर आला असण्याची शक्यता आहे. मात्र, मेलमधील मजकूर गंभीर स्वरूपाचा असल्याने कोणताही धोका पत्करला जाऊ नये, या दृष्टीने प्रशासनाने तातडीने खबरदारीचे उपाय केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवली व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) दाखल केले होते.

पथकाकडून संपूर्ण कार्यालय, आवार, वाहनतळ तसेच आसपासच्या परिसराची कसून तपासणी करण्यात आली. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, यापूर्वीही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला अशाच स्वरूपाच्या बॉम्ब धमक्या मिळाल्या होत्या. वारंवार येणार्‍या धमक्यांमुळे प्रशासन व पोलिसांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर संबंधित मेल पाठवणार्‍याचा शोध घेण्याचा प्रयत्न सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हा मेल परदेशातून आलेला असून तो चुकून जिल्हाधिकारी यांच्या ई-मेलवर प्राप्त झाला असावा. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आणण्याचे काम सुरू आहे. तसेच प्रवेशव्दारावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कार्यालयात येणार्‍यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. संशयास्पद व्यक्तीवरही लक्ष ठेवण्यात येत असल्याचे गीते यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी धमकीचा मेल प्राप्त होताच काही काळासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासन आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.

यापूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलव्दारे देण्यात आली होती. त्या मेलचा व काल, शुक्रवारी प्राप्त झालेल्या मेलचा संदर्भ जुळत नसल्याचे निवासी जिल्हाधिकारी गीते यांनी सांगितले. यापूर्वी आलेला धमकीचा मेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचा उल्लेख होता. तसाच मेल राज्यातील इतर जिल्हाधिकारी कार्यालय व उच्च न्यायालयांना प्राप्त झाले होते. त्यावेळी देखील खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी करण्यात आली होती. शुक्रवारी प्राप्त झालेल्या मेलनंतर देखील तपासणी करण्यात आली असल्याचे गीते यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...