अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला जाहीर केला. शहरात दुपारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत, महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपमहापौरपद भाजपकडे देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. इच्छुकांची संख्या लक्षात घेता अडीच वर्षांचा कार्यकाळात महापौर व उपमहापौर ही पदे पक्षांतर्गत सव्वा-सव्वा वर्ष वाटून दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
नामांतरानंतरचा अहिल्यानगरचा पहिला महापौर होण्याचा मान राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे तर, उपमहापौरपदाचा मान भाजपचे धनजंय जाधव यांना मिळाला आहे. त्यांचे प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्याने 6 फेब्रुवारी होणार्या विशेष निवड सभेत त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे. सोमवारी युतीची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
महापौरपदी प्रभाग क्रमांक तीन मधील नगरसेविका ज्योती अमोल गाडे, तर उपमहापौरपदी भाजपचे प्रभाग क्रमांक पाच मधील नगरसेवक धनंजय जाधव यांचे नाव निश्चित करण्यात आले. या दोन्ही नावांची घोषणा पालकमंत्री विखे यांनी बैठकीत केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री विखे पाटील, आ.जगताप व डॉ. विखे यांनी युतीचा अधिकृत निर्णय जाहीर केला. महापौर व उपमहापौर ही पदे पक्षांतर्गत सव्वा-सव्वा वर्ष वाटून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समितीचे सभापती व उपसभापती, सभागृह नेता, तसेच स्थायी व महिला-बालकल्याण समित्यांच्या सदस्य, स्वीकृत नगरसेवक नियुक्तीबाबत अंतिम निर्णय आ. जगताप व डॉ. विखे संयुक्तपणे घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मूळ ओबीसी-कुणबी वाद नाही : मंत्री विखे
महापौरपदी मूळ ओबीसी उमेदवाराची निवड व्हावी, अशी मागणी काही ओबीसी संघटनांकडून करण्यात येत होती. यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, मूळ ओबीसी आणि कुणबी असा कोणताही वाद नाही. दोन्ही पक्षांच्या कोणत्याही नगरसेवकांकडून अशी मागणी झालेली नाही. काही लोकांकडून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शहर विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार होणार
अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली जाणार असल्याचे पालकमंत्री विखे यांनी सांगितले. ही ब्ल्यू प्रिंट डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप तयार करणार असून, आपण स्वतःही त्याकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते व गटारांपुरताच विकास मर्यादित न ठेवता, रोजगारनिर्मिती, उद्योग व पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल, असेही मंत्री विखे यांनी सांगितले.





