अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जेऊर बायजाबाई (ता. अहिल्यानगर) येथे घरगुती वादातून दोघांनी पती-पत्नीवर धारदार हत्याराने हल्ला करून जखमी केल्याची घटना बुधवारी (११ जून) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. मनिषा दीपक जावळे (वय २६) व दीपक जावळे असे जखमी पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरूवारी (१२ जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी मनिषा जावळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा दीर नितीन रावसाहेब जावळे व सासू अंजना रावसाहेब जावळे (दोघे रा. जेऊर बायजाबाई) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मनिषा जावळे या आपल्या पतीसह घरात असताना त्यांच्या मुलाच्या व दीराच्या मुलाच्या खेळण्यावरून भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी दोघेही गेले असता, अचानक फिर्यादीचा दीर नितीन जावळे व सासू अंजना जावळे हे घटनास्थळी आले.
यावेळी त्यांनी तू माझ्या मुलाला हात का लावलास? असा जाब विचारत मनिषा यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सासू अंजनाबाईंनी मनिषा यांना मारहाण केली, तर नितीन याने धारदार हत्याराने मनिषा यांच्यावर वार करून जखमी केले. तसेच दीपक यांच्या छातीवर देखील हल्ला केला, यात ते जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस अंमलदार दिवटे करीत आहेत.




