Tuesday, May 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : .. अन् मनसे एका जागेवरच थांबली!

पडसाद : .. अन् मनसे एका जागेवरच थांबली!

नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेख गेल्या चौदा वर्षांत चाळीस जागांवरून अवघ्या एका जागेवर आला, ही पडझड केवळ एका पक्षाच्या पतनाची नव्हे तर राज ठाकरे नावाच्या फायरब्रँड नेत्याचीही म्हणता येईल. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत यावेळेस प्रथमच उद्धव व राज हे ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवित असल्याने उभयतांच्या युतीला मोठे यश मिळेल अशी शक्यता व्यक्त होत होती. प्रत्यक्षात, ठाकरेंच्या शिवसेनेने किमान पंधरा जागा तरी मिळविल्या; पण मनसेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. दोन्ही पक्षांना फुटीचे ग्रहण लागले आहेच. २०१२ साली नाशिक महापालिकेतील मनसेच्या सत्तेनंतर पुढच्या निवडणुकीपूर्वीच अनेक जणांनी मनसेतून पक्षांतर केले होते. शिवसेनेतील फूट त्यानंतर बर्‍याच वर्षांनंतर झाली. अर्थात, दोन्ही पक्षातील प्रमुख नेते बाहेर पडल्याने दोन्ही संघटना खिळखिळ्या झाल्या. नाशिकमध्ये तर मनसेचे तीन आमदारही निवडून आले होते. पुढे पालिकेत सत्ता आल्यानंतर यतीन वाघ व अशोक मुर्तडक या दोघांनी महापौरपद भूषविले.

- Advertisement -

आज दोघेही मनसेसोबत नाहीत. वाघ शिवसेनेमार्गे भाजपमध्ये तर मुर्तडकदेखील शिवसेना, भाजप असा प्रवास करून शिंदेंच्या सेनेत गेले. तीन आमदारांपैकी वसंत गिते भाजपमार्गे मूळ शिवसेनेत परतले तर नितीन भोसले राष्ट्रवादीतून अत्यल्प काळासाठी भाजपमध्ये जाऊन नंतर शिंदेसेनेत गेले. तिसरे आमदार उत्तमराव ढिकले यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव राहुल यांनीही भाजपचा स्वीकार करीत आमदारकी खिशात घातली. सुरुवातीच्या काळात मनसेला सत्तेत बसविण्यात सिंहाचा वाटा उचलणार्‍या प्रमुख नेत्यांनी नंतरच्या काळात पक्षद्रोह केल्याने संघटना कमकुवत झाली. नंतरच्या काळात राज व अमित ठाकरे यांनी नाशिकवरील लक्षही कमी केले.

वर्ष-सहा महिन्यांतून ते कधीतरी यायचे अन् जायचे. पण संघटना बांधणीकडे गांभीर्याने कोणी पाहिलेच नाही. दस्तुरखुद्द राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकांमधील धरसोड वृत्तीनेही विश्वासाला तडा गेला. त्यामुळेच पालिकेतील सत्ता जाताना त्यांचे संख्याबळ अवघे पाचवर आले. तीनही आमदारांचा पराभव झाला. मनसेच्या अपयशात तेव्हा भाजपच्या यशाची बीजे रोवली गेली. राज्यात पक्षाचा पहिला महापौर बसविण्याचा मान नाशिकला मिळाला खरा; पण त्याच नाशिकमधून पक्षाची एक्झिटही पाहावी लागली. नंतर कपडे बदलावे एवढ्या सहजपणे पदाधिकारी बदलत गेले. अविनाश अभ्यंकर व बाळा नांदगावकर आदी संपर्कप्रमुख पूर्वी नियमित येत. नंतर त्यांनीही येणे बंद केले. पक्षाची स्थिती अशी खडतर असतानाच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनकर पाटील भाजपला टाटा करून मनसेत आले. येतानाच नाशिक पश्चिम मतदारसंघाची उमेदवारीही घेऊन आले.

स्वभावधर्मानुसार लागलीच त्यांनी पक्षाचा ताबा घेतला. प्रदेशचे पदाधिकारी बनले. संधी मिळेल तेथे भाजपला लक्ष्य करीत राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली आता मनसे पुढे सरकणार असे वाटत असतानाच त्यांनी आपले रंग दाखविले. ठाकरे बंधूंच्या ऐक्याची घोषणा झाली तेव्हा एकमेकांना पेढे भरवून कार्यालयात नाचणारे दिनकर पाटील दुसर्‍याच दिवशी भाजपमध्ये गेले. हा धक्का मनसे पचवू शकली नाही. कारण तोपर्यंत या महाशयांनी पक्ष तर ताब्यात घेतला होताच, शिवाय पालिका निवडणुकीची तयारी करताना मुलाखती घेणे वगैरे सगळ्या भूमिका उत्तम वठविल्या होत्या. आदल्या दिवसापर्यंत भाजपला शिव्या घालणारे पाटील त्याच भाजपच्या कळपात शिरतील असे स्वप्नातही न वाटल्याने पक्षाचे कार्यकर्ते सुन्न झाले. पुढे उरलेल्या काही नेत्यांनी तशाही परिस्थितीत निवडणुकांची सूत्रे हाती घेतली. परंतु शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार हे प्रमुख नेतेच निवडणूक रिंगणात असल्याने आपापल्या प्रभागातच अडकले.

मुंबईतून कोणत्याच स्वरुपाची रसद न मिळाल्याने जे काही मोजके उमदेवार उभे केले, त्यांना स्वत:च्या हिंमतीवर लढावे लागले. ठाकरे बंधूंची एक जाहीर सभा वगळता पक्षाला सार्वजनिक आधार कोणाचाच मिळाला नाही. संघटना नाही, कार्यकर्ते पांगलेले, शेवटच्या क्षणीही सुजाता डेरे, प्रकाश कोरडे, शाम गोहाड अशा असंख्य नेत्यांनी पक्षाला सोडपत्र दिलेले, अशा स्थितीत एखाद्या पक्षाचे बारा वाजणार यात तसेही काही नवल नव्हते. अशा सर्वार्थाने प्रतिकूल वातावरणात अंकुश पवार यांच्या सौभाग्यवती मयुरी पवार यांचा हायप्रोफाईल प्रभागात विजय होणे ही मनसेच्या दृष्टीने धुगधुगी म्हणावी लागेल.

मनसेच्या सत्तेच्या काळात शेवटी का होईना पण बरीच कामे मार्गी लागली होती. बॉटनिकल गार्डन, शस्त्र संग्रहालय, चिल्ड्रेन्स ट्राफिक पार्क, गोदापार्क, रिंगरोड तसेच सिंहस्थाचे आयोजन अशी काही उल्लेखनीय कामे मनसेच्या सत्ताकाळातील सांगता येतील. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे पाच वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाले नव्हते. अशा कामगिरीनंतरही मनसेला नाशिककरांनी सत्तेतून बेदखल केल्याने नाराज झालेल्या राज ठाकरेंनी नाशिकचे नाव टाकले. संघटना तिच्या गतीने चालत राहिली. त्यातील जिवंतपणा गेला होता. त्यात प्राण फुंकण्याचे प्रयत्न फारसे झालेच नाहीत. परिणामी, गलितगात्र अवस्थेतच पालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि मनसे एका जागेवर थांबली.

ताज्या बातम्या

Nashik News : पंचवटीतील श्री काळाराम मंदिरावर उद्या धर्मध्वजारोहण

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकचे श्रद्धास्थान असलेल्या काळाराम मंदिरात अयोध्येच्या धर्तीवर २१ फूट उंच भव्य पितळी ध्वजदंड उभारण्यात आला आहे. या ध्वजदंडावर...