Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँकेकडून मुख्यमंत्री सहायता फंडाला 1 कोटी 11 लाखांची मदत

Ahilyanagar : जिल्हा बँकेकडून मुख्यमंत्री सहायता फंडाला 1 कोटी 11 लाखांची मदत

सर्वसाधारण सभेत चेअरमन कर्डिले यांची माहिती || बँकेच्या क्यूआर कोड सेवेचा शुभारंभ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगरसह राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत सत्कार समारंभाला फाटा देत साध्या पध्दतीने सभेचे कामकाज चालवण्यात आले. सभेपूर्वीच संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत जिल्हा बँकेने अतिवृष्टी बाधितांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता फंडात 1 कोटी 11 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सभेत चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. यावेळी बँकेच्या नवीन क्यूआर कोड सेवेचा शुभारंभ उपस्थितीत पाहुणे आणि संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला.

- Advertisement -

जिल्हा सहकारी बँकेच्या 68 वी वार्षिक सर्वसाधारण गुरूवारी दुपारी 1 वाजता नगरच्या सहकार सभागृहात बँकेचे चेअरमन कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पालकमंत्री विखे पाटील, विधानसभेचे सभापती राम शिंदे, व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे, संचालक आ. मोनिका राजळे, अण्णासाहेब म्हस्के, विवेक कोल्हे, अरूण तनपुरे, चंद्रशेखर घुले, सीताराम पाटील गायकर, बाजीराव खेमनर, भानुदास मुरकुटे, करण ससाणे, अनुराधा नागवडे, गितांजली शेळके, प्रशांत गायकवाड, अमोल गायकर, अंबादास पिसाळ, गणपतराव सांगळे, आशा तापकीर, माजी खा. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

YouTube video player

यावेळी चेअरमन आ. कर्डिले म्हणाले, गेल्या काही वर्षांत जिल्हा बँकेला सलग तीन पुरस्कार मिळाले आहेत. पूर्वी ही बँक कारखानदारांच्या बँकेची ओळख होती, परंतु आता प्रत्यक्षात शेतकर्‍यांची बँक म्हणून उभी राहिली आहे. जिल्हा बँकेमार्फत शेतकर्‍यांना पीककर्ज, सहकारी संस्थांना, पशुपालकांना, बचत गटांना, तसेच साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. आजवर 6 हजार 898 कोटींपेक्षा अधिक कर्जाचे वाटप झाले असून बँकेच्या ठेवी 9 हजार कोटीपर्यंत वाढल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट या सर्वांना जिल्हा बँकेने मदतीचा हात दिला.

त्यामुळे बँकेवरील लोकांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. संचालक मंडळाने केवळ कर्जवाटपावर समाधान न मानता शेतकर्‍यांना आधार देण्याचे काम केले. माजी खा. विखे म्हणाले, मागील तीन वर्षांत चेअरमन कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने उत्कृष्ट कामगिरी केली असून कारखानदारांपुरती मर्यादित असलेली बँकेची ओळख शेतकरी व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली आहे. या संचालक मंडळाच्या टर्मची ही शेवटची सर्वसाधारण सभा असून पुढेही असाच चांगला कारभार सुरू राहावा आणि कर्डिले यांना पुढील वेळी देखील जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तुटपुंजी मदतीऐवजी कर्जमाफी मिळावी- कर्डिले
दरवेळी शेतकरी कर्ज घेतो, पण परतफेडीच्या वेळी तोच शेतकरी अडचणीत सापडतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असताना केवळ त्यांना तुटपुंजी मदत देऊन चालणार नाही. जर खरंच शेतकर्‍यांचे समाधान करायचे असेल, तर कर्जमाफी ही अपरिहार्य ठरणार आहे, असा पवित्रा चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी सभेत घेतला.

कर्जामाफीच आग्रही मागणी
जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थितीत सभासदांनी कर्जमाफीसह नियमित कर्जफेडणार्‍यांना सरकारने मदत करावी, अशी आग्रही मागणी केली. सुरूवातील पालकमंत्री यांच्या भाषणा वेळी देखील कर्जमाफीचा विषय सभासदांनी उपस्थितीत केला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांच्या भाषणाच्या वेळी सभासदांनी कर्जमाफी मिळावी, नियमित कर्जफेडणार्‍या सभासदांना सरकारने वार्‍यावर सोडू नयेत, अशी भूमिका मांडली. सभापती शिंदे यांना देखील आपल्या भाषणात सरकार या विषयी सकारात्मक विचार करेल, असे स्पष्ट केले.

ताज्या बातम्या