अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने यश संपादन करत 18 पैकी 17 जागांवर विजय मिळविला आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून विखे-थोरात यांच्या राजकीय एकजुटीवर जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि बँकेच्या सभासदांनी विश्वासाची मोहोर उमटविली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला हा विजय जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोड ठरला आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ संचालक मंडळाच्या निवडीपुरती मर्यादित नव्हती, तर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील नेतृत्व, संघटनशक्ती आणि राजकीय समन्वयाची कसोटी मानली जात होती. या पार्श्वभूमीवर सहकार विकास आघाडीने सुरुवातीपासूनच एकजुटीची भूमिका घेत नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती आखली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी आणि सभासद यांच्याशी असलेला संपर्क, स्थानिक नेत्यांमधील समन्वय आणि कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद या सर्व बाबींचा आघाडीला मोठा फायदा झाला.
या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने केवळ जागांची संख्या मिळविण्यावर समाधान न मानता अनेक मतदारसंघांत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. कृषी, बिगरशेती, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिला मतदारसंघांमध्ये आघाडीच्या उमेदवारांना मिळालेला भक्कम पाठिंबा हा या विजयाचा महत्त्वाचा पैलू ठरला. विविध मतदारसंघांतील मतमोजणीदरम्यान उमेदवारांनी घेतलेली मोठी आघाडी पाहता मतदारांनी सहकार विकास आघाडीच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केल्याचे चित्र स्पष्ट झाले.
नेत्यांमधील समन्वय, तालुकानिहाय नियोजन, कार्यकर्त्यांची एकजूट आणि सभासदांशी असलेला थेट संपर्क यामुळे आघाडीला निवडणुकीत निर्णायक यश मिळाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून विखे-थोरात यांच्या एकत्रित नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, या निकालाचे पडसाद आगामी जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरणांवरही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




