नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक रिंग रोड आणि महामार्ग क्रमांक २९ साठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनाला घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर पालकमंत्री वाहनात बसत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनासमोर ठिय्या देत विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश देऊनही जिल्हा प्रशासनाकडून त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ३ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत रिंग रोडबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा पाढा वाचला.
मोबदल्याच्या फेरमूल्यांकनाचा प्रश्न प्रलंबित
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जमिनीच्या मोबदल्याचा फेरविचार करण्याऐवजी प्रशासनाने केवळ मोबदल्याचा गुणांक एकवरून दोन करण्यासाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. प्रत्यक्षात जिरायत म्हणून नोंद असलेल्या जमिनींचे वस्तुस्थितीनुसार बागायती व अर्धबागायती क्षेत्र म्हणून फेरसर्वेक्षण करणे, संबंधित गावांतील सर्वोत्तम खरेदीखतांच्या आधारे फेरमूल्यांकन करणे तसेच भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम १०७ व १०८ अन्वये वाढीव मोबदल्यासाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
रिंग रोडच्या अन्य भूसंपादन प्रकरणांमध्ये विहिरी, बोअरवेल, पिके आणि पाण्याचे स्रोत यांची प्रत्यक्ष पाहणी करून बागायती जमिनीचा लाभ देण्यात आला आहे. मात्र, काही गावांतील बागायती जमिनींना हा लाभ दिला जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सर्व गावांमध्ये बागायती क्षेत्र असताना वेगवेगळे निकष का लावले जात आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पर्यायी अलाइनमेंटचा विचार करण्याची मागणी
रिंग रोडच्या प्रस्तावित अलाइनमेंटमुळे गोवर्धन ते मखमलाबाद तसेच विंचूर दळवी परिसरातील घरे, बागायती जमीन, विहिरी आणि बोअरवेल बाधित होत असल्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला. कमीत कमी नुकसान होईल, अशा पर्यायी मार्गाचा विचार करून नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली. गवळवाडी मार्गे पर्यायी अलाइनमेंट निश्चित करून बाधित घरे आणि बागायती क्षेत्राचे नुकसान टाळण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
२८ नोव्हेंबरला सर्व विभागांची संयुक्त बैठक
आंदोलनानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुरुवातीला निवडक शेतकरी प्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, या प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय होण्यासाठी भूसंपादन अधिकारी, नगररचना विभाग, एमएसआयडीसीचे अधिकारी आणि अन्य संबंधित प्रशासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले.
तोडगा निघाला नाही तर जमीन देणार नाही
छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी यावेळी ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश असतानाही जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. २८ नोव्हेंबरच्या बैठकीत जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न, बागायती जमिनींचे फेरसर्वेक्षण, सर्व गावांना समान लाभ, पर्यायी अलाइनमेंट तसेच घरे आणि विहिरींचे संरक्षण या सर्व विषयांवर ठोस निर्णय झाला पाहिजे. अन्यथा नाशिक रिंग रोडसाठी शेतकरी एक इंचही जमीन देणार नाहीत.”
या आंदोलनात सुमारे १७ ते २२ गावांतील रिंग रोड आणि महामार्ग क्रमांक २९ बाधित शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी करण गायकर, सुभाष गायकर, प्रवीण पाटील, दीपक हगवणे, अक्षय कातड, सुदर्शन पाटील, संजय चुंबळे, संतोष सहाने, शिवाजी डांगले, रोशन उगले यांच्यासह छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी आणि बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




