अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्ह्यासहराज्यातील विविध भागांत थंडीचा जोर वाढलाय. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील किमान तापमानात सर्वाधिक घट नोंदवली गेलीये. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, नागपूर, अकोला ह्या जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 10 ते 13 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घसरला आहे. तर गेल्या काही दिवसात वातावरणात बदल जाणवत असून ढगाळ हवामानासह धुक्याचे सावट आहे. आता पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहणार असून राज्यातील वातावरण कोरडे असणार आहे. कुठलीही पावसाची शक्यता नाही.
थंडीचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या आहेत. तसेच जनजीवनावरही परिणाम जाणवू लागला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील तापमानात काहीशी घट होत आहे. पुढील काही दिवस तापमानाचा पारा खाळीच राहणार आहे. 27 नोव्हेंब रोजी मुंबईत निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. कोकण विभागात सुद्धा 27 नोव्हेंबरला कोरडे वातावरण राहील. पुण्यामध्ये बुधवारी मुख्यतः निरभ्र आकाश असेल. पुण्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातील किमान तापमानात सतत बदल होताना दिसून येत आहे. आता पुण्याचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरला आहे. त्यामुळे पुणे तसेच अहिल्यानगरकरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश राहणार आहे. शहरासह जिल्ह्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. बुधवारी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. किमान तापमानात आणखी घट झाल्याने नागरिकांना गारठ्याला सामोरं जावं लागले. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामानाचा अंदाज आहे.
विदर्भात बुधवारी ढगाळ हवामानासह धुक्याचे सावट राहील. नागपूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असेल. विदर्भातील तुरळक जिल्ह्यांत थंडीचा जोर आणखी वाढलाय. ढगाळ वातावरण कायम असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तर पिकांना रोगांचा धोका वाढणार असल्याने शेतकर्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.