Monday, January 12, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सायबर लुटीचा कहर!

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सायबर लुटीचा कहर!

एकाच वर्षात 366 कोटींवर डल्ला || परत मिळाले फक्त 6 कोटी

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

प्रत्येकाच्या हाती मोबाईल आणि सर्व व्यवहार ऑनलाईन हे आधुनिक युगाचे वास्तव असले, तरी याच ऑनलाईन व्यवहारांनी नागरिकांची आयुष्यभराची पुंजी सायबर भामट्यांच्या हाती जात असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. नॅशनल सायबर क्राईम पोर्टलच्या अहवालातून अहिल्यानगर जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव उघड झाले असून, सन 2025 या एकाच वर्षात जिल्ह्यातील 5 हजार 145 नागरिकांची तब्बल 366 कोटी 26 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

सायबर फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी 1930 व 1945 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधून तक्रारी दाखल केल्या, मात्र फसवणूकीत गेलेल्या रकमेपैकी केवळ 6 कोटी 8 लाख 42 हजार रूपयेच परत मिळवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. उर्वरित कोट्यवधी रूपये अद्यापही अज्ञात सायबर चोरट्यांच्या खात्यांमध्ये अडकले आहेत. ते पैसे मिळविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र ते परत मिळतील याची काहीच शाश्वती दिसत नाही.

YouTube video player

ऑनलाईन रेडिंग, टास्क-बेस्ड जॉब, शेअर मार्केट गुंतवणूक, ट्रेडिंग, बनावट अ‍ॅप्स, तसेच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो नागरिकांना सायबर भामट्यांनी जाळ्यात ओढले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील सुशिक्षित वर्ग या फसवणुकीला बळी पडत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. नोकरी शोधण्यापासून ते खरेदी, बँकिंग व्यवहार आणि शेअर मार्केट गुंतवणूक अशा सर्व काही ऑनलाईन होत असताना, ऑनलाईन व्यवहारांचे अपुरे ज्ञान आणि अति विश्वास हेच सायबर गुन्हेगारांचे हत्यार बनले आहे.

कोणतीही गुंतवणूक करताना त्याची माहिती घेतली जात नाही. ऑनलाईनचे ज्ञान कमी असल्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. त्यांनी टाकलेल्या फसवणूकीच्या जाळ्यात सुशिक्षित नागरिक सहज अडकत आहे. सायबर फसवणूक झाल्यानंतर तात्काळ तक्रार दाखल केल्यास रक्कम परत मिळण्याची शक्यता असते. मात्र प्रत्यक्षात अनेक नागरिक तक्रार दाखल करण्यास उशीर करतात. तक्रार तात्काळ दाखल केल्यास सायबर पोलिसांकडून संबंधीत रक्कमेचा तपास केला जातो. ती रक्कम ज्या बँक खात्यात गेली ते खाते गोठवून रक्कम परत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात.

सन 2025 मध्ये दाखल झालेल्या 5 हजार 145 तक्रारींपैकी 4 हजार 05 तक्रारी निकाली काढण्यात आल्या, तर 1 हजार 140 तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी सायबर पोलिसांनी वर्षभरात 21 हजार 786 संशयित बँक खाती फ्रिज केली. एवढ्या मोठ्या कारवाईनंतरही केवळ सहा कोटींच्या आसपासचीच रक्कम परत मिळू शकली, ही बाब सायबर गुन्ह्यांची व्याप्ती आणि गुंतागुंत स्पष्ट करते. दरम्यान, याच तक्रारीतून काही गुन्ह्यांची नोंद केली जाते. फसवणुकीची रक्कम पाच लाखांपेक्षा कमी असल्यास संबंधीत पोलीस ठाण्यात व पाच लाखांपेक्षा अधिक असल्यास सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो.

सन 2025 मध्ये सायबर पोलीस ठाण्यात 18 गुन्हे नोंदवण्यात आले, ज्यामध्ये 9 कोटी 10 लाख 21 हजार 963 रूपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या 18 गुन्ह्यांपैकी 9 गुन्हे उघडकीस आले असून 11 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून फक्त 45 लाख 49 हजार 768 रूपयेच जप्त करण्यात आले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे, कमी रकमेची फसवणूक झालेली अनेक प्रकरणे तक्रारीशिवायच राहतात, त्यामुळे प्रत्यक्ष फसवणुकीचे प्रमाण आकडेवारीपेक्षा कितीतरी अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फसवणुकीचे वेगवेगळे फंडे
सायबर गुन्हेगारांकडून फसवणूकीचे वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. त्याला नागरिक सहज बळी पडतात. फसवणूक करणारे बहुतांश गुन्हेगार हे परप्रांतीय किंवा परदेशात बसून सायबर गुन्हे करत असल्याने, तपास यंत्रणांना अनेक मर्यादा येत आहेत. त्यामुळे एकदा गेलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे. सायबर गुन्हेगारांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सायबर गुन्हेगार आपले ठिकाण बदलतात. तसेच फसवणूकीची रक्कम घेण्यासाठी जी बँक खाती वापरली जाते त्या व्यक्तीला फारच कमी मोबदला दिला जातो. तसेच त्या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहचले तरी मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नाही.

नागरिकांनी सतर्क राहावे
सोशल मीडियावर तासन्तास घालवून, कोणतीही खात्री न करता गुंतवणूक करणे, अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा संशयास्पद कॉल्सवर विश्वास ठेऊन त्यांना बँक खात्याची माहिती देणे, ओटीपी देणे हेच मोठ्या फसवणुकीस कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 किंवा 1945 वर संपर्क साधावा, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

ताज्या बातम्या

AMC Election : महापालिका निवडणुकीसाठी मतदान, मतमोजणीची तयारी पूर्ण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या गुरूवारी, 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे....