अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा नगर जिल्ह्यात विशेषतः दक्षिण भागात वरूणराजाची चांगलीच कृपा असल्याचे दिसत आहे. मात्र, जिल्ह्याच्या उत्तर भागातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर आणि अकोले तालुक्यांतील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. या ठिकाणी जून ते सप्टेंबर अखेर पडणार्या एकूण पावसाच्या सरासरीच्या 60 ते 80 टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या शेतीसाठी वरदान असलेल्या मोठ्या धरणांमध्ये आणि मध्यम प्रकल्पांमध्ये शतप्रतिशत पाणीसाठा असल्याने यंदा शेतीसह पिण्याच्या प्रश्नाचे निराकरण होणार आहे.
यंदा जिल्ह्यात मान्सून पावसाने जोरदार सलामी दिली. या पावसाचे प्रमाण सुरूवातीपासून दक्षिण जिल्ह्यात अधिक होते. जून महिन्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर ऑगस्टपर्यंत मोठ्या पावसात खंड पडल्याचे दिसून आले. पण सुरूवातीला जोरदार बरसलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला चालना मिळाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याच्या दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सप्टेंबर महिन्यातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात पडणार्या पावसापेक्षा धरणांच्या कॅचमेंट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्या मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांमध्ये जवळपास 100 टक्के पाणीसाठा आहे. सध्या अनेक धरणांमधून आणि प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून यामुळे नदी काठावरील गाव परिसरात सध्या पाणीच पाणी दिसत आहे.
तीन मोठ्या धरणांसह जिल्ह्यात सहा महत्त्वाचे मध्यम प्रकल्प आहेत. हे सर्व नगर दक्षिणेत असून या प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. यातील काही प्रकल्प महिनाभरापूर्वीच ओसांडून वाहू लागले होते. यामुळे यंदा रब्बी हंगामासह उन्हाळी हंगामातील शेतीसाठी पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पडलेल्या एकूण पावसाच्या प्रमाणात जिल्ह्यातील उत्तर भागातील कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत 60.3 टक्के, राहाता तालुक्यात 70.8 टक्के, श्रीरामपूर 71.8 टक्के, राहुरी 72 टक्के, संगमनेर 73.5 टक्के, जामखेड 78 टक्के, अकोले तालुक्यात 79 टक्के आणि नगर 80 टक्के पाऊस झाला आहे. तर सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पाथर्डी तालुक्यात 119 टक्के, कर्जत 107 टक्के, शेवगाव आणि नेवासा 105 टक्के, पारनेर 88 टक्के, श्रीगोंदा 88 टक्के झाला आहे.
100 टक्के पाणी साठा
भंडारदरा, मूळा, निळवंडे, आढळा, मांडओहळ, पारगाव, घाटशिळ, सीना, खैरी आणि विसापूर या ठिकाणी शंभर टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी यातील मांडओहळमध्ये 48 टक्के, घाटशिळमध्ये 12 टक्के तर मुख्य धरणात 98 ते 99 टक्के पाणीसाठा होता. धरणाच्या लाभक्षेत्रात अद्याप पावसाने उघडी दिलेली नाही. त्यामुळे धरणात पाणी आवक सुरू आहे.




