अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी जिल्ह्यातील मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळलेल्या दुबार नोंदीमुळे राजकीय पक्षांनीही सावध भूमिका घेतली आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांनी वारंवार व्यक्त केलेल्या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या पडताळणीमध्ये जिल्ह्यात तब्बल 18 हजार 617 दुबार मतदार सापडले आहेत.
दरम्यान दुबार नावे रोखण्यासाठी आयोगाने बीएलओंच्या माध्यमातून सखोल तपासणी मोहीम राबवली. मुदतवाढ मिळाल्यानंतरही काही मतदारांची नावे वेगवेगळ्या यादीमध्ये कायम असल्याचे निदर्शनास आले. आता अशा मतदारांची प्रत्यक्ष चौकशी करून ते प्रत्यक्षात कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याची खातरजमा केली जाईल. या सर्व संशयित मतदारांच्या नावांसमोर आयोगाने आता ‘डबल स्टार’ (*) अशी विशेष खूण देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे मतदारयाद्या तपासतांना राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच नागरिकांना संबंधित मतदारांची ओळख पटवणे सोपे होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोग 1 जुलै 2025ची मतदार यादी ग्राह्य धरणार आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषद व 14 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 30 लाख 7 हजार 404 मतदार, 12 नगरपालिकांसाठी 4 लाख 51 हजार 262 मतदार, तर महापालिकेतील 3 लाख 7 हजार 9 मतदार मतदानासाठी पात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या पडताळणीत जिल्ह्यात 18 हजार 617 दुबार मतदार आढळून आले आहेत.
यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या यादीत 1 हजार 500, नगरपालिकेच्या यादीत 6 हजार 518, तर महापालिकेच्या मतदार यादीत 10 हजार 599 संभाव्य दुबार नावे आढळून आली आहेत. दरम्यान मतदारयादीत डबल स्टार असलेल्या नोंदी वाढल्याने राजकीय पक्षांनीही सावध भूमिका घेतली आहे. यादींची बारकाईने छाननी करून दुबार नाव कुठे निश्चित झाले आहे, मतदार कोणत्या प्रभागात मतदान करणार आहे याची खात्री करून घेणे आवश्यक होणार आहे.




