Tuesday, February 3, 2026
HomeनगरRain News : नगर, पारनेर, श्रीगोंदा व कर्जतमध्ये अतिवृष्टी सुरूच

Rain News : नगर, पारनेर, श्रीगोंदा व कर्जतमध्ये अतिवृष्टी सुरूच

भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर कायम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात मान्सूनपूर्व अर्थात वळवाचा पाऊस सुरूच असून गेल्या 24 तासात तब्बल 22 महसूल मंडलात 65 मिलिमीटर तर 58 मंडळात 40 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. शनिवारी श्रीगोंद्यात जोरदार अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर रविवारी कर्जत तालुका पावसाने झोडपून काढला असून रविवारी अहिल्यानगर शहरासह तालुका, श्रीगोंदा, पारनेर व कर्जत या चार तालुक्यात पावसाने झोडपून काढले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा सलग तीन दिवस सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यात शनिवारी व रविवारी दक्षिण नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर व तालुका, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत व राहुरी या तालुक्यात पावसाचा जोर चांगलीच वाढला होता. त्यामुळे नदीनाल्यांना पूर आला होता. भाजीपाला, कांदा, आंबा, केळी, पपई आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतकर्‍यांची दाणादाण झाली. उत्तर नगर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी दक्षिण ज्या पद्धतीने पाऊस पडत होता. तो कधी नव्हे असा होता.

YouTube video player

सोमवारी अहिल्यानगर शहरात दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर ऊन पडले होते. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेती पिकांसोबत काढणी झालेला कांदा, शेतकर्‍यांचे पूशधनाची आणि भिज पावसाने काही घरांचे नुकसान झाले आहे.

रविवारी झालेला पाऊस तालुकानिहाय : अहिल्यानगर 52.4, पारनेर 62.6, श्रीगोंदा 57.4, कर्जत 72, जामखेड 32, शेवगाव 48, पाथर्डी 42.2, नेवासा 40.4, राहुरी 48.8, संगमनेर 32.1, अकोले 37, कोपरगाव 3.5, श्रीरामपूर 8.2, राहाता 12.9 असा जिल्ह्यात एकूण 43.0 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

58 मंडळात दमदार ते अतिवृष्टी
58 ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यात नगर तालुक्यातील केडगाव 40. 5, भिंगार 73.3, नागापूर 75, जेऊर 54, चिचोंडी 66, चास 93, रुईछत्तीशी 40, नेप्ती 71, पारनेर 69, भाळवणी 91, वाडेगव्हाण 63, वडझिरे 50, निघोज 59, टाकळी ढोकेश्वर 67, कान्हूर पठार 60, पळवे खुर्द 66, श्रीगोंदा 58, काष्टी 55, बेलवंडी 41, पेडगाव 94, देवदैठण 77, भानगाव 83, आढळगाव 83, कर्जत 103, भांबोरा 85, कोंभळी 74, माही जळगाव 72, कुळधरण 49, वालवड 103, खेड 136, अरणगाव 42, नान्नज 43, शेवगाव 54, भातकुडगाव 54, बोधेगाव 45, चापडगाव 45, ढोरजळगाव 57, एरंडगाव 43, दहिगावने 43, मुंगी 43, पाथर्डी 49, माणिकदौंडी 49, करंजी 61, मिरी 63, तिसगाव 61, कुकाणा 45, घोडेगाव 50, सोनई 63, देवगाव 45, राहुरी 65, टाकळीमिया 65, वांबोरी 64, बारागाव नांदूर 64, समनापुर 40, समशेरपुर 42, कोतूळ 46, ब्राह्मणवाडा 46 अशी पावसाची नोंद झालेली आहे.

भिमा नदीकाठावर सर्तकतेचे आदेश
पुणे जिल्ह्यात भिमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भिमा नदीस दौंड पुल येथे 19 हजार 55 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भिमा नदीकाठावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

28 तारखेपर्यंत यलो अर्लट
जिल्ह्यात 26 ते 28 मे दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी यलोअलर्टही जारी करण्यात आला असुन नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर कायम

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

निसर्गाचं वरदान लाभलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात सोमवारी (दि.26) देखील पावसाचा जोर टिकून होता. यामुळे धरणातही हळूहळू पाण्याची आवक वाढू लागली आहे. तर सायंकाळच्या वेळी कळसूबाई शिखर परिसर धुक्यात हरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच रविवारी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे हवामान विभागाने घोषित केले.

यामुळे बळीराजा सुखावला आहे. भंडारदरा पाणलोटातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने डोंगरदर्‍यांमधून पाणी धरणात जमा होवू लागले आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता 59 दलघफू नवीन पाणी जमा झाल्याची नोंद झाली आहे. तर निळवंडे धरणातही 79 दलघफू पाणी विसावले आहे. वाकी तलावही 55 टक्क्यांच्या वर सरकला आहे. यापुढेही पावसाचा जोर टिकून राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे धरणात जमा होणार्‍या नवीन पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर...