अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यात जोरदार हजेरी लावली. जमिनी उफाळून आल्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने पेरण्याची घाई करू नका, असे आवाहन केले तरी या जिल्ह्यात शेतकर्यांनी 1 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली आहे. आतापर्यंत 15 टक्के पेरणी झाली असून जून महिन्याच्या 13 दिवसात 46.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बहुतांशी ठिकाणी वापसा न मिळाल्याने अद्यापही पेरणी रखडली आहे.
मे महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात अजूनही खरीप हंगामातील पेरणीच्यादृष्टीने पुर्वमशागतीचे काम सुरू आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे अजूनही शेतामध्ये पाणी-पाणी आहे. काही गावांमध्ये माती वाहून गेल्याने शेतकर्यांना पेरणी करणे अवघड झाले आहे. विशेषतः नगर तालुक्यातील दक्षिण भाग, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर या भागात अतिवृष्टी व ढगफूटीसदृश्य पाऊस झाल्याने अजूनही जमिनीमध्ये पाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी पेरण्या लांबल्या आहेत. काही भागात पेरण्या सुरू झाल्या आहेत.
त्यात उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी या भागात पेरण्या सुरू झाल्या आहेत. यंदा खरीपासाठी 6 लाख 93 हजार 342.35 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत 1 लाख 239 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी झाली आहे. अकोले तालुक्यात रोपवाटीका प्रक्षेत्रावर 490.0 हेक्टर क्षेत्रावर भात रोप तयार करण्यात आली आहेत. तर यंदा 18 हजार 740 हेक्टर क्षेत्रावर भाताचे नियोजन केलू असून 1.0 क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे.
पिकनिहाय झालेली पेरणी
बाजरी 8 हजार 251.30 हेक्टर, मका 8 हजार 542.40 हेक्टर, तूर 10 हजार 726, मूग 14 हजार 963 हेक्टर, उडीद 25 हजार 21 हेक्टरवर, सोयाबीन 19 हजार 627, तर कापूस 12 हजार 926 हेक्टर लागवड झाली आहे.





