अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शनिवारी दुपारनंतर व रात्री ते रविवारी सकाळपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळच घातला. नगर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर या नऊ तालुक्यांत अतिमुसळधार पावसाने हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला, तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अतिवृष्टीने शेतकरी कोलमडला असून मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीने उभ्या पिकांचा अक्षरश: चिखल झाला आहे. शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला असून काढणीला आलेली पिकं गुडघाभर पाण्यात आहेत. पाऊस थांबला असलातरी शेतांना अद्यापही तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेले असून शेतकर्यांच्या डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एकट्या राहाता तालुक्यातच 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल नेवासा तालुक्यात 119.9 मिलीमीटर पाऊस एकाच दिवशी झाला आहे.
दरम्यान, पाणलोटामध्ये तुफान पाऊस होत असल्याने भंडारदरा आणि निळवंडेतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. भंडारदरातून 13764 क्युसेक तर निळवंडेतून 17199 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. तसेच अन्य भागातून पाणी येत असून नदीतील पाणी जवळपास 20 हजार क्युसेकच्या पुढे गेले आहे. त्यामुळे प्रवरा नदीला पूर आला आहे. नाशिक जिल्ह्यातही धो-धो पाऊस कोसळत असल्याने नांदूर मधमेश्वर बंधार्यातून रात्री 9 वाजता 87 हजार 579 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पाऊस सुरु असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने रात्री 10 वाजता जायकवाडी धरणातून 3 लाख 1 हजार 824 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.
शेवगाव तालुक्यात नागरिकांच्या बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची तर नगरमध्ये बोटींचा वापर करण्यात आला.
या पावसात नेवासा तालुक्यात व जामखेड तालुक्यात अंगावर भिंत पडून प्रत्येकी एक या प्रमाणे दोन महिला तर राहाता तालुक्यात दोघे पुराच्या पाण्यात बेपत्ता आहेत. यामुळे शनिवारच्या पावसात पाच बळी गेले आहेत. नगर शहर आणि तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नगरच्या सीना नदीला चौथ्यांदा पूर आला. या पूराच्या पाण्याची व्याप्ती नगर शहरातील नालेगाव अमरधामपर्यंत पोहचली. यामुळे नेप्ती नाका आणि नालेगावचा पूर्वकडील भाग हा पूराच्या पाण्याने व्यापला होता. अखेर एनडीआरएफच्या जवानासह नगर महानगर पालिकेच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून या भागातील पूरातील पाण्यात अडकलेल्या कुटूंबाला बाहेर काढले.
जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या पावसात नऊ तालुक्यातील सर्व मंडलासह पारनेर व श्रीगोंद्यातील काही मंडल अशा 83 मंडलामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सर्वच जिल्ह्यात पाणी-पाणीच झाले होते. काही तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत पाऊस कोसळत होता. जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठा प्रमाणावर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत व अहिल्यानगर या पाच तालुक्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी शनिवारीच्या पावसाने झाली आहे. तब्बल 81.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय शनिवारीचा पाऊस(आकडेवारी मिलीमीटरमध्ये) अहिल्यानगर 91.9, जामखेड 92.5, शेवगाव 89.3, पाथर्डी 93.9 नेवासा 119.9 मिलीमीटर, राहुरी 85.6, कोपरगाव 113.2, श्रीरामपूर 102.8, राहाता 150.8, पारनेर 58.2, श्रीगोंदा 49.4, कर्जत 60.6, संगमनेर 51.6, अकोले 41.9. दरम्यान, तालुक्याच्या इतिहासात प्रथमच देवटाकळी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर दाखल होतेे. मात्र बचाव कार्यात अडचणी आल्याने ते मागे परतले.
सर्वाधिक पाथर्डीमध्ये 191 टक्के पाऊस
गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सलग पावसाचा जोर सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या अकोले तालुक्यात अद्यापही सरासरीपेक्षाही कमी पाऊस आहे. या तालुक्यात आतापर्यंत 90.3 टक्केच पाऊस झाल्याची नोंद असतांना सर्वाधिक पाऊस पाथर्डी तालुक्यात 191.9 टक्के पाऊसाची नोंद झाली आहे. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढा पाऊस या तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. अहिल्यानगर 129.9, पारनेर 125, श्रीगोंदा 136.8, कर्जत 148.6, जामखेड 143.1, शेवगाव 166, पाथर्डी 191.9, नेवासा 158.3, राहुरी 100.3, संगमनेर94.8, अकोले 90.3, कोपरगाव 95.3, श्रीरामपूर 103.2, राहाता 112.6. तर एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस हा नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम महसूल मंडळात 200 मि.मी. झालेला आहे.
नगर दक्षिणेतील स्थिती
नगर दक्षिण जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पिंपरखेड- अरगाव, फक्राबाद, दिघोळ-माळेवाडी, खर्डा-तेलंगशी, खर्डा- जायभायवाडी, नान्नज-जवळके, राजुरी-पिंपळगाव, वाघा, जामखेड-रत्नापुर, साकत- कोल्हेवाडी, पिंपळगाव-तरडगाव, सोनेगाव आदी रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. नगर- कल्याण रोडवरील वाहतूक शनिवारी मध्य रात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होवू शकली नव्हती. या ठिकाणी पूराच्या पाण्याचा मोठा फटका 80 ते शंभरच्या जवळपास कुटूंबाला बसला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.
विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सलग मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला असून धरणे भरल्याने आता त्यातून नदीपाात विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजता धरणांमधून सोडलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे आहे. भिमा नदी पात्रात 30 हजार 700 क्युसेक, गोदावरी नदीपात्रात नांदूरमध्यमेश्वर धरणातून 87 हजार 549 क्युसेक, जायकवाडी धरणातून 2 लाख 26 हजार 637 क्युसेक, . घोड नदीपात्रात घोड धरणातून 35 हजार क्युसेक, हंगा नदीपात्रात विसापूर धरणातून 4 हजार 215 क्युसेक, कुकडी नदीपात्रात येडगावमधून 7 हजार 200 क्युसेक, सीना नदीपात्रात सीना धरणातून 27 हजार 800 तर खैरी धरणातून 4 हजार 791 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
शेवगावच्या मुंगीला अतिदक्षतेचा इशारा
जायकवाडी धरणाचे नियमित व आपत्कालीन असे 27 दरवाजे उघडून 1 लाख 98 हजार 072 क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेवगाव तालुक्यातील मुंगी गावाला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाचजणांचा मृत्यू, तर चौघे जखमी, 45 जनावरे दगावली; 590 घरांची पडझड
रविवारी सकाळपर्यंत अतिवृष्टी व पुरात पाच नागरिकांचा मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले आहेत. यात राहाता तालुक्यातील दोघांचा समावेश असून एक महिला आणि पुरूष नेवासा आणि एक जामखेड तालुक्यातील आहे. तर नेवाश्यात दोन तर राहातामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 590 घरांची पडझड झाली असून जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराचे 355 घरात पाणी शिरले होते. यात नगर तालुक्यात 36, नेवासा 42 व राहाता तालुक्यातील 277 घरांचा समावेश आहे. पावसात 18 जनावरांच्या गोठ्यांची अतिवृष्टीने हानी झाली आहे. तसेच 45 मोठी दुधाळ जनावरे दगावली असून 2 हजार 645 कुक्कुट पक्षी मृत झाले असून राहाता तालुक्यात 2 हजार 500 व जामखेड तालुक्यात 145 पक्षी मृत झाले आहेत.
अतिवृष्टीमध्ये 45 मोठी दुधाळ जनावरे दगावली आहेत. त्यात अहिल्यानगरमध्ये दोन, जामखेडमध्ये 16, नेवाश्यात 7, पाथर्डी 1, राहुरी 1, श्रीरामपूरमध्ये दोन जनावरांचा समावेश आहे. तसेच 2 हजार 645 कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. एकट्या राहाता तालुक्यात 2 हजार 500 कोंबड्या दगावल्या आहेत. तर जामखेडमध्ये 145 कोंबड्या मरण पावल्या आहेत.
प्रशासनाचे बचावकार्य
सरला, ढोकसरी (ता. श्रीरामपूर) येथील 3 कुटुंबांतील 7 व्यक्तींना नगरपालिका टीमने सुरक्षित ठिकाणी हलवले. भोकर शिवारातील पांढरे वस्त्यांमधील पुराच्या पाण्यात अडकलेल्या 16 व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. कोल्हार बु., ता. राहाता येथील गावाच्या कडेलगत असलेल्या वस्तीतून 8 नागरिकांची सुटका करण्यात आली. साकोरी शिवरस्ता, ता. राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल फाऊंटनजवळील नाल्यात वाहून जात असताना अक्षय गोरे व अमोल व्यवहारे यांची सुटका करण्यात आली. पाण्यात वाहून गेलेले रोहित खरात व प्रसाद विसपुते यांचे मृतदेह आढळून आले आहेत. वारी, ता. कोपरगाव येथील टेके वस्तीत पाण्यात अडकलेल्या 27 व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून अद्यापही 6 व्यक्ती अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जामखेड तालुक्यातील चौंडी गावास पाण्याचा वेढा बसला असून 70 टक्के लोक गडावर गेलेले आहेत तर 30 कुटुंबे अण्णासाहेब डांगे आश्रमशाळेत आहेत. उर्वरित 30 टक्के नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील रेडी नदीला आलेल्या पुरामुळे नदीशेजारील अडकलेल्या कुटूंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. वाघमारे वस्तीवरील सर्व कुटूंबांना तीन मजली बिल्डिंगमध्ये सुरक्षित हलविण्यात आले आहे.
नेवासा, जामखेडमधील मयत
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे घराची भिंत कोसळून पारुबाई किसन गव्हाणे, वय 68 वर्षे या मयत झाल्या आहेत. नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील पिराजी भीमराव पिटेकर, वय 80 वर्षे यांचा राहत्या घराची भिंत कोसळुन मृत्यू झाला आहे. नेवासा तालुक्यातील भानसहिवरे ते रांजणगाव रोडवरील नदीच्या पुलावरुन रस्ता ओलांडत असताना महेंद्र लाजरस मकासरे, वय 28 वर्षे हे 5 वाजेच्या सुमारास वाहून गेले आहेत.
शेवगाव- कर्जतमध्ये एनडीआरएफचे पथक
सीना धरणाचाा विसर्ग वाढल्यामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पाणी पातळी वाढत असून ग्रामस्तरीय यंत्रणा कार्यरत आहे. अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत पावसामुळे कल्याण रोडवरील नवीन पुलाच्या बांधकामाजवळील रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरातील नेप्ती नाका परिसरात सीना नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात पसरल्याने पर्यायी मार्गांचा वापर सुरू आहे. शेवगाव तालुक्यात एसडीआरएफचे पथक तर कर्जत तालुक्यामध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.
2 हजार 68 विहीरीचे नुकसान
जिल्ह्यात 313 गावांतील 2 हजार 68 विहिरीचे नुकसान झाले आहे. यात नगर तालुक्यातील 120, अकोले 1, जामखेड 276, कर्जत 340, नेवासा 59, पारनेर 13, पाथर्डी 1 हजार 34, राहुरी 41, संगमनेर 1, शेवगाव 125, श्रीगोंदा 7, श्रीरामपूर 20, राहाता तालुक्यातील 31 विहीरींचा समावेश आहे.
श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक पडझड
जिल्ह्यातील 599 घरांची पडझड झाली असून नगर तालुका 121, अकोले 1, जामखेड 34, कर्जत 12, कोपरगाव 7, नेवासा 40, पारनेर 2, राहुरी 80, पाथर्डी 5, संगमनेर 21, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 260, राहाता तालुक्यातील 13 घरांची पडझड झाली आहे.
साडेतीन हजार नागरिकांचे स्थलांतर, 60 जणांची सुटका
रविवारी पुराच्या पाण्यात अडकलेल्या 3 हजार 497 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने 60 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने अहिल्यानगर तालुक्यातील 9 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. जामखेड तालुक्यात 42, कर्जत 456, कोपरगाव 200, नेवासा 659, राहुरी 498, संगमनेर 84, शेवगाव 76, श्रीरामपूर 74 तर राहाता तालुक्यातील 1 हजार 399 व्यक्ती सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
सीना, खैरी, हंगा, कुकडी, ढोरा, नंदीनी नद्यांना पूर
शनिवारी रात्री जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना, खैरी, हंगा, कुकडी, ढोरा, नंदीनीसह जवळपास सर्वच नद्यांना पुर आल्याने पुरामुळे नदीकाठचे लोक दहशतीखाली आहेत. यात शेवगाव-गेवराई, नेवासा-शेवगाव, अहिल्यानगर-पाथर्डी, नेवासा फाटा-शेवगाव, शेवगाव-पैठण, शेवगाव-तिसगाव यासह बर्याच मार्गावरील वाहतुक बंद होती.




