अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी संततधार पाऊस सुरू होता. शुक्रवारी रात्री जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार वादळी वार्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, शनिवारी पहाटेपासून नगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरू होता. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. दुपारी पावसाने उघडीप दिली. त्यानंतर दुपारी चारनंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली.
जिल्ह्यात मे महिन्यातील अलिकडच्या काही वर्षांत सर्वाधिक अवकाळी पावसाची नोंद झाली असून यामुळे हजारो शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळामुळे नागरिकांच्या पूशधनासह घरांचे आणि कांदा चाळीचे नुकसान झाले आहे. यासह मोठ्या संख्येने उन्हाळी कांदा व फळबागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, येत्या 27 तारखेपर्यंत नगर जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा यलो अर्लट जारी केला आहे. यामुळे गेल्या आठ दिवसांपासून भागात सुरू असणारा अवकाळीचा कहर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.
दरम्यान, 15 मे नंतर जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतीच्या मशागतीची कामे सुरू होणार आहेत. यंदा मे महिन्याच्या सुरूवातीपासून पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी खरीप हंगामाच्या पूर्व तयारीसाठीची शेतीची कामे रखडली आहेत आणि यंदा लवकरच्या पावसामुळे खरीप हंगामाचे चित्र बदलणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यात जोरदार अवकाळीच्या हजेरीमुळे ग्रामीण भागात पाण्याचे तलाव, ओढे, नाले यांना पावसाळ्याप्रमाणे पाणी आल्याचे दिसत आहे. विशेषतः नगर दक्षिणेतील तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे.