अहिल्यानगर (प्रतिनिधी)
पती आणि सासरच्यांनी वेळोवेळी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केला असून, लग्नात दिलेल्या मानपानावरून आणि 30 लाख रूपये कंपनीसाठी आणावेत म्हणून विवाहितेला वारंवार त्रास देण्यात आला. अखेर छळ सहन न झाल्याने सध्या सावेडी उपनगरात राहणार्या विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पतीसह सासरच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिताने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह 20 ऑगस्ट 2021 रोजी पुण्यातील विक्रांत श्रीकांत जोशी याच्याशी झाला. विवाहाच्या काही दिवसांतच सासरी तिच्या माहेरच्या मंडळींकडून सोनं व 30 लाख रूपयांची मागणी सुरू झाली. विवाहानंतर केवळ चार दिवसांनी म्हणजेच 24 ऑगस्ट 2021 रोजी सासू-सासर्यांनी तिच्या आई-वडिलांशी वाद घालत सोनं दिलं नाही अशी तक्रार केली. त्या रात्री सासरच्या पती, सासू, सासरे, दिर, जाऊ आणि नणंद यांनी फिर्यादीशी वाद घालून शिवीगाळ व मारहाण केली.
यानंतरच्या काळातही सतत त्रास सुरूच राहिला. प्रत्येक सणाला काही ना काही मागण्या केल्या जात होत्या. दिवाळीच्या सणानंतर तिच्या पतीने स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठी 30 लाखांची मागणी केली. रक्कम न दिल्यामुळे सासरच्या लोकांनी तिला जबरदस्तीने माहेरी पाठवले. या दरम्यान ती दोन महिन्यांची गर्भवती होती. प्रसूतीनंतरही संपर्क न ठेवता तिला दुर्लक्षित करण्यात आले. आठ महिन्यांनी ती सासरी परत गेली, पण पुन्हा अपमानास्पद वागणूक आणि शिवीगाळ सुरू झाली. तिच्या मुलीच्या बारशाला सुध्दा माहेरच्या लोकांशी सासरच्यांनी वाद घातला आणि पुन्हा पैशाची मागणी केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी पती विक्रांत श्रीकांत जोशी, सासू अनिता श्रीकांत जोशी, सासरे श्रीकांत गोविंदराव जोशी, दिर तुषार श्रीकांत जोशी, जाऊ अनघा तुषार जोशी (सर्व रा. बाणेर, पुणे) नणंद पल्लवी सत्यजित कुलकर्णी (रा. गांधीनगर, गुजरात) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.




