राहाता । प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध रित्या सुरू असलेल्या चंदन तस्करीच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) लोणी परिसरात एका कारवर छापा टाकून ३० किलो चंदनासह एका तस्कराला अटक केली आहे. या कारवाईत ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या तस्करीचे नाशिक कनेक्शनही समोर आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तपासासाठी विशेष पथक नेमले होते. १८ डिसेंबर रोजी हे पथक लोणी परिसरात गस्तीवर असताना त्यांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. नाशिकहून श्रीरामपूरच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून चंदनाची तस्करी होत असल्याचे पोलिसांना समजले.
मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तळेगाव ते लोणी रस्त्यावरील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटर परिसरात सापळा रचला. संशयित कार परिसरात दाखल होताच पोलिसांनी तिला वेढा घालून थांबवले आणि चालकाला ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता पोलिसांना त्यात मोठ्या प्रमाणात चंदनाची लाकडे सापडली. या कारवाईमध्ये पोलिसांनी ६० हजार रुपये किमतीचे ३० किलो चंदनाचे लाकूड, ५ लाख रुपयांची मारुती सुझुकी स्विफ्ट कार आणि १० हजार रुपयांचा मोबाईल संच असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी हनुमंता भिमा मोरे (रा. उंबरगाव, ता. श्रीरामपूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक तपासात त्याने हे चंदन उत्तम नारायण पवार (रा. पळसे, ता. सिन्नर, जि. नाशिक) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. सध्या नाशिकमधील संशयित आरोपी पवार हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ३०३(२), ३(५) तसेच भारतीय वन कायदा १९२७ आणि महाराष्ट्र वन अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस करत असून या तस्करीमध्ये आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किरणकुमार कबाडी, राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, प्रमोद जाधव, सतिष भवर, सुनिल मालणकर आणि चालक महादेव भांड यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे चंदन तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.




