Saturday, January 17, 2026
HomeनगरAhilyanagar Election Result : अहिल्यानगर महानगरपालिकेवर युतीचा झेंडा!

Ahilyanagar Election Result : अहिल्यानगर महानगरपालिकेवर युतीचा झेंडा!

अहिल्यानगर । प्रतिनिधी

अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीने स्पष्ट बहुमत मिळवत नगर शहराच्या सत्तेवर झेंडा फडकावला आहे. 68 जागांच्या महापालिकेत युतीने तब्बल 52 जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सर्वाधिक जागा मिळवून 27 जागांसह प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असून युतीमधील भाजपने 25 जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले आहे. महायुतीमधील घटक पक्ष असणार्‍या शिंदे सेना नगरमध्ये भाजप- राष्ट्रवादी विरोधात निवडणूक रिंगणात होती. या ठिकाणी शिंदे सेनेला अवघ्या 10 जागा मिळाल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, विरोधात असणार्‍या महाविकास आघाडीचा नगरमध्ये जवळपास सुफडासाफ झाला आहे. आघाडीचा घटक पक्ष असणार्‍या उध्दव ठाकरे गटाला अवघी एक, काँग्रेसला 2 तर शरद पवार गटाला भोपळाही फोडता आला नाही. या निवडणुकीत एमआयएमला 2 तर बसपाला 1 जागेवर विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे कालच्या निकालात नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाला शहरातील मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. 27 विजयी जागांपैकी दोन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. भाजप 25 जागांसह दुसर्‍या क्रमांकावर राहिला असून, त्यातील तीन जागा बिनविरोध होत्या. महायुतीतून ऐनवेळी बाहेर पडत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसेना (शिंदे गट) ने 10 जागा जिंकत आपले अस्तित्व राखले. मात्र, पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला एकही जागा मिळवता आली नाही. काँग्रेसला केवळ दोन, तर शिवसेना ठाकरे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. एमआयएमने दोन, तर बसपाने एक जागा जिंकली आहे.

YouTube video player

या निवडणुकीत 68 पैकी 5 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित 63 जागांसाठी 283 उमेदवार रिंगणात होते. गुरूवारी (15 जानेवारी) शहरातील 345 मतदान केंद्रांवर सुमारे 65 टक्के मतदान झाले. शुक्रवारी (16 जानेवारी) नागापूर एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी पार पडली. प्रथम टपाली मतदानाची, त्यानंतर इव्हीएमवरील मतदानाची मोजणी करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता प्रभाग क्रमांक सातचा अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व प्रभागांचे निकाल घोषित करण्यात आले. निकालादरम्यान मतमोजणी केंद्र परिसरात समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती होणार की नाही याबाबत अनेक बैठका व चर्चा झाल्या. मात्र अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात शिंदे सेना बाहेर पडली.

भाजपचे सोन्याबाई शिंदे, करण कराळे, पुष्पा बोरूडे आणि राष्ट्रवादीचे कुमार वाकळे व प्रकाश भागानगरे हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने युतीने सुरूवातीलाच सत्ता मिळवण्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादीने 32 जागा लढवून 27, तर भाजपने 29 जागा लढवून 25 जागांवर विजय मिळवला. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव व त्यांच्या पत्नी अश्विनी जाधव यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीचे नेतृत्व खासदार निलेश लंके यांनी केले होते. मात्र शरद पवार गटाचा भोपळाही फुटला नाही, यामुळे नगरकरांनी या नेतृत्वाला स्पष्ट नकार दिल्याचे चित्र आहे.
भाजपकडून निखिल वारे, ऋग्वेद गंधे, धनंजय जाधव, बाबासाहेब वाकळे, सागर मुर्तडकर, दत्तात्रय गाडळकर यांच्यासह अनेक उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर, डॉ. सागर बोरूडे, अविनाश घुले, माजी महापौर गणेश भोसले यांच्यासह केडगाव परिसरात पक्षाने विशेष यश मिळवले.

पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 27
भाजप : 25
शिवसेना (शिंदे गट) : 10
काँग्रेस : 2
एमआयएम : 2
शिवसेना (ठाकरे गट) : 1
बसपा : 1

ताज्या बातम्या

Nashik MC Election : महाजन ठरले ‘सुपर हिरो’, मालेगावात भुसेच ‘दादा’

0
नाशिक । शैलेंद्र तनपुरे- दै. देशदूत संपादक | Nashik आयाराम, गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिल्यावरून पक्षासह नाशिककरांच्या (Nashik) टीकेचे धनी झालेल्या मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)...