अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात येणार्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (6 फेब्रुवारी) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी आपले प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छूक असलेल्या निर्वाचित नगरसेवकांना दि. 29, 30 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी रोजी कार्यालयीन वेळेत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार आहेत. ही नामनिर्देशन पत्रे नगरसचिव कार्यालयात स्वीकारली जाणार आहेत. दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेला सुरूवात होणार असून, सर्वप्रथम महापौर पदासाठी तर त्यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सभेच्या प्रारंभी पीठासन अधिकारी प्राप्त झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी करतील. त्यानंतर नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी 15 मिनिटांची मुदत देण्यात येईल. माघारीनंतर एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्यास हात उंचावून मतदान पध्दतीने निवडणूक घेतली जाणार आहे.
महापौर पदाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपमहापौर पदासाठीही हाच निवडणूक कार्यक्रम लागू राहणार आहे.
दरम्यान, कोरे नामनिर्देशन पत्रे नगरसचिव, अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या कार्यालयातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या निर्वाचित पालिका सदस्यांनी नामनिर्देशन पत्रे पूर्ण भरून निर्धारित तारीख व वेळेत नगरसचिवांकडे प्रत्यक्ष दाखल करणे बंधनकारक आहे. महापौर किंवा उपमहापौर पदासाठी कोणत्याही उमेदवारास चारपेक्षा अधिक नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार नाहीत. तसेच कोणत्याही एका पालिका सदस्यास एका पेक्षा अधिक उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे सुचविता किंवा त्यास अनुमोदन देता येणार नाही, असेही आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महापौरपद ओबीसी महिला राखीव असले तरी त्यावर राष्ट्रवादी दावा करणार की भाजप, या दोन्ही पक्षांपैकी कोण इच्छुक आहेत, ओबीसी महिलेला संधी मिळणार की कुणबी दाखला असलेल्या महिलेला, यादृष्टीने कोणत्या महिला शर्यतीत येऊ शकतात, अशा एक ना अनेक मुद्यांच्या अनुषंगाने शहरभर चर्चा झडत आहेत. नव्या नगरसेवकांकडूनही या पतंगबाजीला हवा दिली जात आहे. मात्र, नेते मंडळींच्या स्तरावर हा विषय असल्याचेही स्पष्ट केले जात आहे. एकूणच नगरचे महापौरपद आता चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, मनपात 10 जागा जिंकून तिसरा मोठा पक्ष असलेल्या शिंदे सेनेने त्यांच्या गट नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांचा गट नेता कोण होणार, याचीही उत्सुकता आहे.





