अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महापालिकेच्या दहाव्या महापौरपदी ओबीसी महिला बसणार आहे. नगरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेतून निवडून आलेल्या नऊ महिला असून, यात राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप यांच्या प्रत्येकी 3, शिंदेसेनेच्या दोन व एमआयएमची एक महिला आहे. मात्र, या महिलांपैकी असलेल्या मूळ ओबीसी महिलेला संधी दिली जाते की कुणबी प्रमाणपत्र असलेल्या महिलेची या पदावर वर्णी लागते याची उत्सुकता आहे. याशिवाय, यंदाची सत्ता मनपात सर्वाधिक जागा जिंकणारा राष्ट्रवादी पक्ष घेतो की भाजपला देतो, हाही कळीचा मुद्दा आहे.
दरम्यान, एमआयएम पक्षाचे नेते खा. ओवेसी यांनी नगरचा महापौर एमआयएमच्या मदतीशिवाय होणार नसल्याचा दावा येथील प्रचार सभेत केला होता. या पार्श्वभूमीवर महापौरपदासाठीची महिला उमेदवार एमआयएम पक्षाकडेही असल्याने त्यांचा सत्ता प्रक्रियेत सहभाग राहतो, काय तसेच शिंदे सेनेकडेही दोन महिला असल्याने त्या काय करतात, याचीही उत्सुकता आहे. कारण, राष्ट्रवादी आणि भाजप यांना एकमेकांना दूर ठेवून सत्ता सोपान गाठण्यास शिंदे सेनाही पाठबळ देऊ शकत असल्याने अशी काही समीकरणे जुळतात काय, महापौरपदासाठी घोडेबाजार रंगतो काय की परस्पर समन्वयाने राष्ट्रवादी व भाजप शांततेत सत्ता स्थापन करतात काय, याचीही उत्सुकता आहे.
नगर मनपाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजितदादा गटाने 27, भाजपने 25 व शिंदेसेनेने 10 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय एमआयएम व काँग्रेसने प्रत्येकी 2 आणि ठाकरे सेना व बहुजन समाज पक्षाने प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. मनपाती सर्वाधिक जागा मिळवणारा मोठा पक्ष अजित दादा गट राष्ट्रवादी आहे व दुसर्या क्रमांकावर भाजप आहे. पण यंदाचे महापौरपद भाजपकडे घेण्याचा इरादा पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा आहे. या पार्श्वभूमीवर राष्टवादी काय निर्णय घेते याची उत्सुकता आहे. मागील 2018 च्या निवडणुकीनंतर भाजपचा पहिला महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या रुपाने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पाठिंब्यानेच झाला होता. त्यावेळच्या सत्तेत राष्ट्रवादीने प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता.
स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती, सभागृह नेता अशी पदे भाजपने घेतली होती व राष्ट्रवादीला विरोधी पक्ष नेतेपद दिले होते. त्यानंतरच्या महाविकास आघाडीच्या काळातही राष्ट्रवादीने तेव्हाच्या ठाकरे सेनेच्या रोहिणी शेंडगे यांना पाठिंबा देऊन महापौर केले होते. मात्र, त्यावेळी स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती, सभागृह नेते व विरोधी पक्ष नेते अशी अन्य पदे आपल्याकडे ठेवली होती. या पार्श्वभूमीवर, सलग पाच वर्षे मनपा मुख्य सत्तेपासून दूर राहिलेल्या राष्ट्रवादीद्वारे यावेळीही सत्तेवर पाणी सोडले जाते की नाही, याची उत्सुकता आहे.
नऊ महिलांपैकी असणार कोण
महापालिकेत नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेवर नऊ महिला निवडून आल्या आहेत. यात राष्ट्रवादीच्या व भाजपच्या प्रत्येकी तीनजणी आहेत. शिंदे सेनेच्या दोन आणि एमआयएमची एक महिला आहे. भाजपच्या नगरसेविकांमध्ये नूतन गट नेत्या शारदा ढवण (प्रभाग 1), पुष्पा बोरुडे (प्रभाग 7) व आशा कातोरे (प्रभाग 8) तर राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सुजाता पडोळे (प्रभाग 13), वर्षा काकडे (प्रभाग 16) व अश्विनी लोंढे (प्रभाग 17) या नगरसेविका आहेत. शिंदे सेनेच्या रुपाली दातरंगे (प्रभाग 9) व मंगल लोखंडे (प्रभाग 12) आणि एमआयएमच्या शहेनाज शेख (प्रभाग 4) अशा नऊ नगरसेविका आहेत. याशिवाय सर्वसाधारण जागांवर निवडून आलेल्या ओबीसी महिलांमध्ये आशा डागवाले (प्रभाग 11), सुनीता फुलसौंदर (प्रभाग 14) व संध्या पवार (प्रभाग 2) याही तीनजणी आहेत. पण महापौरपद ओबीसी महिला असे राखीव असल्याने या सर्वसाधारण मधून निवडून आलेल्या महिलांना संधी मिळणार की नाही, याचा संभ्रम आहे.
14 ठिकाणी महिला राज !
29 महापालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण गुरूवारी मुंबईत जाहीर झाले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. 50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. राज्यातील 29 महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झालं होतं. तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली होती. महाराष्ट्रातील 29 महापौरपदांपैकी अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जाती 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 8 व सर्वसाधारण 17 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.




