अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत 100 टक्के सवलत दिली आहे. तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाईही सुरूच ठेवली आहे. गेल्या दोन दिवसात महानगरपालिकेच्या सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने आठ थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यात पाचजणांच्या घरांना, खोल्यांना सील ठोकण्यात आले आहे. तर, तिघांचे नळ कनेक्शन तोडून पाणी बंद करण्यात आले आहे. मालमत्ताधारकांनी शास्तीमध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा व कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने अरुण रणमले यांच्याकडे असलेल्या 1 लाख 65 हजार 454 रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांचे घर सील केले आहे. एकनाथ सौंदाणे यांच्या 1 लाख 13 हजार 176 रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले. मालमत्ताधारक अरुण शिरसाठ यांच्याकडे मालमत्ताकाराची 99 हजार 177 रुपये थकबाकी असल्याने त्यांची मालमत्ता सील करण्यात आली. मालमत्ताधारक विजय जोशी यांच्याकडे मालमत्ताकराची 1 लाख 50 हजार 706 रुपये थकबाकी असल्याने त्यांची मालमत्ताही सील करण्यात आली. तसेच मालमत्ताधारक आर. एम. उतेकर यांच्याकडे मालमत्ताकराची 1 लाख 40 हजार 120 रुपये थकबाकी असल्याने त्यांची एक खोली सील करण्यात आली.
मालमत्ताधारक शेख मेहबूब अब्बास भाई यांच्याकडे मालमत्ताकराची 1 लाख 67 हजार 878 रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले. मालमत्ताधारक श्रीमती सुभद्रा प्रभाकर नेटके यांच्याकडे मालमत्ता कराची 1 लाख 69 हजार 734 रुपये थकबाकी असल्याने त्यांची एक रूम सील करण्यात आली. प्रभाग अधिकारी बबनराव काळे, कर निरीक्षक ऋषिकेश लखापती, वसुली लिपिक संजय तायडे, संदीप कोलते, सागर जाधव, राजेश आनंद, मंजाबापू लहारे, किशोर देठे, गोरख ठुबे यांच्या पथकाने ही कारवाई केली.