अहिल्यानगर । प्रतिनिधी
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने शहरात आपले वर्चस्व निर्माण केले असून प्रभाग १, २ आणि ३ मधील निकाल हाती आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जोरदार कामगिरी केली आहे. येथून राष्ट्रवादीचे संपत बारस्कर, सागर बोरूडे आणि दीपाली बारस्कर हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या शारदा दिगंबर ढवण यांनी एका जागेवर विजय मिळवला आहे.
प्रभाग २ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळाली. येथे दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीकडून महेश तवले आणि संध्या पवार विजयी झाले, तर भाजपकडून रोशनी त्र्यिंबके आणि निखील वारे यांनी विजयाचा गुलाल उधळला.
प्रभाग ३ मध्ये चौरंगी लढत झाली, ज्यात महायुतीने ४ पैकी ३ जागा जिंकल्या. भाजपचे ऋग्वेद गंधे, राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे आणि गौरी बोरकर विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, महायुतीच्या या लाटेतही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे योगीराज गाडे यांनी कडवी झुंज देत विजय मिळवला आणि पक्षाचे खाते उघडले.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडलेली ही निवडणूक गुरुवारी (दि. १५) पार पडली. आजच्या निकालांनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष सुरू केला असून, उर्वरित प्रभागांतील निकालांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




