Tuesday, February 3, 2026
HomeनगरDam Water Level : भंडारदरा ४० तर निळवंडेत ३६ टक्के पाणीसाठा, आढळा...

Dam Water Level : भंडारदरा ४० तर निळवंडेत ३६ टक्के पाणीसाठा, आढळा ६६ टक्के भरले; पावसाचा जोर कमी

भंडारदरा (वार्ताहर)

भंडारदरा धरण परिसरात गत चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात गत २४ तासांत नव्याने ३९९ दलघफू पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी अपेक्षेप्रमाणे ४१०१दलघफू (३७.१५टक्के) झाला होता. सुरू असलेला पाऊस आणि होणारी पाण्याची आवक लक्षात घेता हा पाणीसाठा आज ४० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, निळवंडे धरणातीलही पाणीसाठा वाढत असून हे धरणही ३६ टक्के भरणार आहे.

- Advertisement -

काल सकाळी संपलेल्या २४ तासांत धरणात नव्याने ७६० दलघफू पाणी दाखल झाले. सकाळी पाणीसाठा ३९९४ दलघफू होता. तर निळवंडेत २३८ दलघफू पाणी आले. आढळा पाणलोटातही जोरदार पाऊस होत असल्याने ९६ दलघफू पाणी दाखल झाल्याने काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा काल सकाळी ६७५ दलघफू झाला होता. सायंकाळी तो ७०१ दलघफूवर पोहचला होता.

YouTube video player

गत तीन दिवसांपासून पाणलोटात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. त्यामुळे दोन दिवसांत भंडारदरात विक्रमी नवीन पाण्याची आवक झाली. या दोन दिवसांच्या तुलनेत काल शुक्रवारी पावसाचे प्रमाण काहीसे कमी होते. पण पाण्याची आवक जोमाने सुरू आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा आज ४० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन गारठले असून पशुधनही गारठले आहे नेकलेस, नाणी, पांजरे आदी फॉल आक्राळ विक्राळ रुद्र रूप धारण करून वाहत आहेत. त्यामुळे भंडारदरा धरणात पाणीसाठ्यात तासागणिक वाढ होत आहे. तसेच भात खाचरे ही तुडुंब भरले, भात शेती ही धोक्यात आली असून शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून जनावरांना गोठ्यात बांधून ठेवण्यात आले आहे.

मुळातील साठा १०२०३ दलघफूवर

दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात पाण्याची आवक घटली आहे. काल सकाळी मुळा धरणात ६ हजार ९५१ क्युसेकने आवक सुरू होती. ती सायंकाळी पावसाने उघडीप दिल्याने २ हजार २४७ (कोतूळ इनफ्लो) क्युसेकसवर आली. धरणाची पातळी काल दिवसभर धरणाच्या पाणी पातळीत ७०९ दलघफू ची वाढ झाली. सकाळी धरणाचा साठा ९ हजार ४९४ दलघफू होता. तो वाढून सायंकाळी १० हजार २०३ दलघफू इतका झाला. गुरूवारी रात्री कोतूळ ४४ मि.मी. तर मुळाडॅम ०४ मि.मी. पावसाची नोंद झाली.

दारणा ६२, गंगापूर ६५ टक्क्यांवर; गोदावरीत ९४६५ क्युसेकने विसर्ग

दारणाच्या व गंगापूर च्या पाणलोटातील मुसळधार पावसामुळे दारणा ६२ टक्क्यांवर तर गंगापूर ६५ टक्क्यांवर पोहचले. दारणा, गंगापूर तसेच कडवा व पालखेड मधुन सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल सकाळी ६ वाजता २९३०७ क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. पावसाचा जोर ओसरल्याने हा विसर्ग काल सायंकाळी ९४६५ क्युसेकवर आला होता.

मागील दोन दिवसांपासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह नाशिक तसेच जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे धरणांच्या साठ्यात वाढ झाली. जून मध्येच धरणं निम्म्याहून अधिक भरल्याने त्यातुन विसर्ग करणे क्रमप्राप्त असल्याने जलसंपदा विभाग या धरणांमधून विसर्ग करत आहे. काल सकाळी ६ पर्यंत मागील २४ तासांत दारणाच्या भिंतीजवळ १५५ मिमी पावसाची नोंद झाली. मुकणेच्या भिंतीजवळ १५१ मिमी, वाकीला १५८ मिमी, भाम ला १६० मिमी, भावलीला ११७ मिमी, वालदेवीला ४८ मिमी, गंगापूरला ७० मिमी, कश्यपीला ८४ मिमी, गौतमी गोदावरीला ११४ मिमी, कडवा ७४ मिमी, आळंदी ६८ मिमी, नाशिक ६० मिमी, घोटी ८६ मिमी, त्र्यंबकला १०७ मिमी असा पाऊस नोंदला गेला.

मुसळधार पावसामुळे दारणात २४ तासांत सव्वा टीएमसी पाणी दाखल झाले. कालपर्यंत दोन टीएमसीहुन अधिक नव्याने पाणी या धरणात दाखल झाले. या धरणातून ४७४२ क्युसेकने विसर्ग सोडणे सुरु आहे. हे धरण ६२.१२ टक्के इतके भरले आहे. गंगापूर धरणात २४ तासांत ८९२ दलघफू नव्याने पाणी दाखल झाले. हे पाणी जवळपास एक टीएमसी इतके आहे. गंगापूरचा पाणीसाठा ६५.३८ टक्क्यांवर पोहचला आहे. मुकणे ४३.८७ टक्के, वाकी ४३.२२ टक्के, भाम २९.८३ टक्के, भावली ५३.७० टक्के, वालदेवी ४१.३९ टक्के, कश्यपी ४०.३३ टक्के, गौतमी गोदावरी २२.१६ टक्के, कडवा ४४.२५ टक्के, आळंदी १४.५८ टक्के, पालखेड ७९.७९ टक्के, भोजापूर ४५.९८ टक्के असे साठे धरणांचे आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरणांतील साठा ४०.९५ टक्के इतका झाला आहे. मागील वर्षी हा साठा कालच्या तारखेला अवघा ५.७७टक्के इतका होता. यंदा धरणांची परिस्थिती मागील वर्षीच्या तुलनेत सध्यातरी समाधानकारक आहे.

नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात गंगापूर मधून ११६० क्युसेकने, दारणातुन ४७४२ क्युसेक ने, कडवा तुन ५३० क्युसेकने, पालखेड मधुन २८०० क्युसेक ने, तसेच नाशिक परिसरातून तसेच या बंधाऱ्याच्या पाणलोटातुन पावसाचे पाणी दाखल होत असल्याने या बंधाऱ्यातून काल सकाळ पर्यंत १ जून पासुन १.३ टीमएसी पाण्याचा विसर्ग जायकवाडी च्या दिशेने झाला आहे. काल सायंकाळी ६ वाजता या बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत ९४६५ क्युसेकने विसर्ग सुरु होता.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...