अहिल्यानगर (प्रतिनिधी)
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. सात दिवसात समितीला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डॉ. बोरगे यांना ऑगस्ट 2024 मध्ये दोन वेळा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मुख्यत्वे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यक्रमांचे प्रतिमाह असणारे रँकिंग हे राज्यातील महानगरपालिकांच्या शेवटच्या पाच गुणानुक्रमे आलेले आहे. या प्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीसच्या अनुषंगाने सुधारणा करण्याबाबत निर्देश दिलेले होते. तथापि यामध्ये त्यांची कुठलीही प्रगती दिसून आलेली नाही. तसेच त्यांनी दिलेले खुलासे असमाधानकारक आहेत. त्यांच्या गैरवर्तनाबाबत वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येवून व वाजवी संधी देवून देखील त्यांच्या वर्तनामध्ये कोणताही सकारात्मक बदल व कामकाजामध्ये सुधारणा झाली नाही.
महाराष्ट्र शासनाकडील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या महानगरपालिकांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झालेली नाही. त्यांच्या विभागातील कर्मचार्यांवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवणे ही विभाग प्रमुखाची जबाबदारी असताना ती पार पाडण्यात कसूर झालेला असल्याने व वारंवार होणार्या अशा वर्तनामुळे कामकाजावर विपरित परिणाम होवून महानगरपालिकेची उद्दिष्ट पुर्ती झालेली नाही, असा ठपका ठेवत डॉ. बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, डॉ. बोरगे यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागामध्ये काय चालू होते, याचीच चौकशी करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी चौकशी समिती नियुक्त केली असल्याचे दिसून येत आहे. या समितीला सात दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश आल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक डांगे काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सात दिवसात अहवाल देण्याचे आदेश
आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीसाठी उपायुक्त विजयकुमार मुंडे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार व प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर या अधिकार्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. येत्या सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.