Tuesday, March 25, 2025
HomeनगरAhilyanagar News: ठेकेदाराने माजी सरपंचाच्या श्रीमुखात लगावली; जिल्हा परिषदेतील घटना

Ahilyanagar News: ठेकेदाराने माजी सरपंचाच्या श्रीमुखात लगावली; जिल्हा परिषदेतील घटना

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

पारनेर तालुक्यातील जलजीवन योजनेच्या अपूर्ण कामाच्या आढावा बैठकीदरम्यान ठेकेदार आणि माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांच्यात बाचाबाची होवून चिडलेल्या ठेकेदाराने ग्रामपंचायत सदस्याच्या थेट कानाखाली ठेवून दिली. हा प्रकार इतका अचानक घडला की उपस्थित अधिकाऱ्यांची देखील यावेळी भंबेरी उडाली.

- Advertisement -

दरम्यान या घटनेनंतर पाणीपुरवठा विभागाने घडलेल्या प्रकाराबाबत कानावर हात ठेवत बैठकीत काही लोकांमध्ये वादावादी झाली. मात्र वाद घालणारे ते कोण होते, माहीत नसल्याचे सांगत घडलेल्या प्रकारापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. पारनेर तालुक्यातील जलजीवन योजनेतील कामाचा आढावा घेण्यासाठी, रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, पारनेर पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग यांनी नगरला जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शुक्रवारी दुपारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच. बी. चव्हाण यांच्यासह तालुका पातळीवरील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, जलजीवन पाणी योजना अपूर्ण असणाऱ्या गावातील सरपंच यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते.

बैठकीत पारनेर तालुक्यातील एका गावाच्या जलजीवन योजनेचा आढावा सुरू होता. यावेळी संबंधित गावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आणि पाणी योजनेचा ठेका घेतलेला ठेकेदार आणि त्यांचे सहकारी हजर होते. बैठकीत संबंधीत गावातील जलजीवन पाणी योजनेचा आढावा सुरू असतांना ठेकेदार आणि संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांच्या अपूर्ण कामावरून हमरी-तूमरी झाली. एकमेकांनी पाणी योजना अपूर्ण असल्याचे कारण पुढे केले. सुरुवातीला गरमागरम सुरू असणारी ही चर्चा अखेरच्या टप्प्यात पोचली त्यावेळी संतप्त झालेल्या ठेकेदाराने थेट ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकवली.

बैठकीत घडलेला प्रकार अनपेक्षित असल्याने सुरुवातीला काय झाले हे कोणालाच समजले नाही. मात्र प्रकरण हातघाईवर आल्याचे पाहताच अधिकारीही थरथरले. बैठकीत हजर असणाऱ्यांपैकी काहींनी पुढे होत ठेकेदार आणि सदस्य यांना बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांनी एकमेकांच्या डोक्यात खूर्ची घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे गडबडलेल्या अधिकाऱ्यांनी बैठक आखडती घेतली. काही वेळाने तणाव निवळ्यानंतर सर्वजन निघून गेले. दरम्यान याबाबत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाशी संपर्क केला असता, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाशी या वादाचा संबंध नाही. संबंधीत गावात असणाऱ्या वादाचे पडसाद बैठकीत उमटले, असे सांगत हात झटकले. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात शांतता होती. बाहेरच्या लोकांचे वाद जिल्हा परिषदेत घडल्याने पुन्हा जिल्हा परिषदेची बदनामी होणार अशी भावना काहींनी यावेळी व्यक्त केली.

निमंत्रण नसतांना सदस्य आले कसे ?

दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर पाणी पुरवठा विभागाच्या सुत्रांच्या माहितीनुसार ही बैठक जलजीवन विभागाच्या अपूर्ण कामे असणाऱ्या गावातील ठेकेदार आणि सरपंच यांच्यासाठी होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बैठकीत कशासाठी आले हे समजले नाही. शिवाय अपूर्ण कामाबाबत ठेकेदार याच्या विरोधात तक्रार केल्याने ठेकेदार संपप्त झाला. तर संबंधीत ठेकेदाराने संबंधीत सदस्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्यानंतरही तक्रार केल्याने ठेकेदार चिडला असल्याची माहिती काही उपस्थितांनी दिली.

हॉट पारनेरचे नगरमध्ये पडसाद

आधीच पारनेर तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील झालेला आहे. तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामाबाबत तक्रारी असतांना आता ठेकेदार आणि ग्रामपंचायत सदस्यात हाणामारी झाल्याने त्याचे पडसाद तालुक्यात उमटणार आहे.

आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शुक्रवारी तालुक्यातील सरपंच आणि ठेकेदार यांची बैठक बोलवण्यात आली. यावेळी अपूर्ण कामावरून काही लोकांमध्ये वाद झाले. वाद घालणारे कोण होते, हे ओळखत नाही. झालेला वाद हा आपआपसातील असण्याची शक्यता आहे.

एच. बी. चव्हाण, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, अहिल्यानगर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...