अहिल्यानगर (प्रतिनिधी)
कांदा व्यापाराच्या व्यवहारात तब्बल 1 कोटी 61 लाख 573 रूपये रकमेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तिघा परप्रांतीय व्यक्तीविरूध्द गुरूवारी (20 नोव्हेंबर) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी विलास जर्नादन दरंदले (वय 48, रा. बुरूडगाव रस्ता, वाकोडी, ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
हनिफ बागवान, मोहम्मद शफी, मोहम्मद शमी (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. ख्वाजा कादिर कॉलनी, नुरबाग, बीलालाबाद, कुलबर्गी, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. संशयित आरोपींकडून विश्वास संपादन करून दीर्घकाळ व्यवहार केल्यानंतर जून 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान ही फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
व्यापारी दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 20 जून 2024 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत येथील नेप्ती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा व्यवहार सुरू होते. त्याच दरम्यान संशयित आरोपींनी दरंदले यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सुमारे 10 कोटी सहा लाख 39 हजार 843 रूपये किमतीचा एकूण 46 हजार 290 गोण्या कांद्याची खरेदी केली.
या व्यवहारांपैकी संशयित आरोपींनी दरंदले यांना सुमारे आठ कोटी, 45 लाख 39 हजार 270 इतकी रक्कम अदा केली. मात्र उर्वरित एक कोटी 61 लाख 573 रूपये इतकी रक्कम वारंवार मागणी करूनही परत न देता आरोपी गायब झाले. त्यामुळे अखेर दरंदले यांनी पोलिसांकडे धाव घेतली. दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलिसांनी गुरूवारी रात्री गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक पतंगे अधिक तपास करीत आहेत.
व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण
कृषी बाजार समित्यांतील मोठ्या व्यवहारांतून अशा प्रकारची फसवणूक होणे ही नवी बाब नाही. यापूर्वी देखील अशाच पध्दतीने माल उचलून देयके न करणार्या परप्रांतीय टोळ्या सक्रिय असल्याचे अनेक प्रकरणांत समोर आले आहे. त्यामुळे व्यापार्यांमध्ये असुरक्षितता वाढली असून दलाल व व्यापार्यांची कायदेशीर पडताळणी व व्यवहार नोंदीकरण अधिक काटेकोर होण्याची गरज असल्याची चर्चा बाजार समितीत सुरू आहे.




