Tuesday, February 3, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगरमधील पोलिसच निघाला प्रमुख ड्रग्ज तस्कर

Ahilyanagar : अहिल्यानगरमधील पोलिसच निघाला प्रमुख ड्रग्ज तस्कर

शिरूरमध्ये 20 कोटींचे ड्रग्ज जप्त प्रकरण || माल पुरविणारा पारनेरचा || अटकेतील संख्या तीनवर

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

पुणे ग्रामीण पोलिसांनी तब्बल 10 किलो 707 ग्रॅम मफेड्रोन (एमडी) जप्त करताना या रॅकेटचा सूत्रधार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी शामसुंदर विश्वनाथ गुजर (वय 39, रा. नेप्ती, ता. अहिल्यानगर) असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, गुजर याने हे ड्रग्ज पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या जप्त मुद्देमालातूनच चोरी करून विक्री केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, अंमली पदार्थविरोधी कारवाई करून जप्त केलेल्या मुद्देमालातून ड्रग्ज रॅकेट चालविण्याचा प्लॅन पोलीस कर्मचार्‍याने केल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलालाच खाकीतील एका हाताने काळी किनार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अंमली पदार्थविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार 17 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शिरूर परिसरात एमडी विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. 18 जानेवारी रोजी मध्यरात्री डंबेनाला परिसरात छापा टाकून शादाब रियाज शेख (वय 41, गॅरेज चालक) याला ताब्यात घेण्यात आले.

YouTube video player

त्याच्याकडून 1 किलो 52 ग्रॅम एमडी व दुचाकी, असा सुमारे 2 कोटी 10 लाख 70 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पुढे नेत असताना पोलिसांच्या हाती पारनेर तालुक्यातील माऊली शिंदे व त्याच्या पंटरची नावे लागली. माऊली शिंदेकडून 9 किलो 655 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. चौकशीत शिंदेने हे ड्रग्ज पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर याच्याकडूनच घेतल्याची कबुली दिली. तांत्रिक तपासातही गुजरचा थेट सहभाग निष्पन्न झाला. दरम्यान, नगर एलसीबीतील गुजरचे नाव समोर येताच वरिष्ठांच्या आदेशाने पुणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी (20 जानेवारी) सायंकाळी अहिल्यानगर गाठले. पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देऊन एलसीबीच्या कार्यालयात हजर असलेल्या शामसुंदरला ताब्यात घेतले. तशी नोंद त्यांनी नियंत्रण कक्षाला कळविली.

शामसुंदरला ताब्यात घेतल्याची बातमी वार्‍यासारखी जिल्हा पोलीस दलात पसरताच कोण शामसुंदर गुजर, त्याचा व ड्रग्ज प्रकरणाचा काय संबंध? अशा चर्चा झडत एकमेकांना फोनाफोनी सुरू झाली. गुजरचे पोलीस दलातील काळे कारमाने यानिमित्ताने चर्चेत आले. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे. त्याला अजून कोणी मदत केली का? त्याने ड्रग्जचे रॅकेट कशा पध्दतीने चालविण्याचा प्लॅन तयार केला होता. हे ड्रग्ज कुठे विक्री होणार होते. त्यातून गुजरला किती पैसे मिळाले, याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.

ड्रग्जच्या जागी भरला मैदा !
शामसुंदर गुजर 2008 साली पोलीस दलात भरती झाला. ऑगस्ट 2025 मध्ये त्याची स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती झाली. अहिल्यानगर जिल्ह्यात जप्त होणार्‍या अंमली पदार्थांच्या मुद्देमालची जबाबदारी त्याच्याकडे होती. यासाठी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र मुद्देमाल कक्ष आहे. या कक्षाची चावी त्याच्याकडेच असायची. तसेच, या विभागाचा सर्व पत्रव्यवहार देखील तोच सांभाळत होता. पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांचे यावर नियंत्रण असून देखील गुजरने आपली चलाखी वापरली. धक्कादायक बाब म्हणजे, जप्त ड्रग्जच्या जागी मैदा भरून ठेवून संशय टाळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलीस अधीक्षक व निरीक्षकांचे नियंत्रण असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी कशी झाली, यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

श्रीरामपूरात पकडलेल्या ड्रग्जचीही विक्री
स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून यापूर्वी 69 किलो ड्रग्ज व 338 किलो कच्चा माल जप्त केला होता. हा सर्व मुद्देमाल पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आला होता. तो नष्ट होईपर्यंत त्याची जबाबदारी गुजरकडे होती. याच संधीचा फायदा घेत त्याने 10 किलोहून अधिक एमडी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले, अशी माहिती तपासात समोर येत आहे.

बडतर्फीची प्रक्रिया सुरू; स्वतंत्र गुन्हा अपेक्षित
ड्रग्ज प्रकरणात पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास थेट बडतर्फीचे आदेश मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार गुजरवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, जप्त मुद्देमालाची चोरी व विक्री केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंद होणे अपेक्षित असताना तो अद्याप नोंदविण्यात आलेला नाही.

वरिष्ठ अधिकारी अडचणीत
गुजरने हे कृत्य एकट्याने केले की त्याला कुणाचे पाठबळ होते? मुद्देमाल कक्षाची जबाबदारी एकट्यावर होती का? नियंत्रण ठेवणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांना हा प्रकार कसा लक्षात आला नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले असून, या प्रकरणामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपासातून या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश होणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर...