अहिल्यानगर (प्रतिनिधी)
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात स्टेनोचे काम पाहणारा पोलीस कर्मचारी दीपक सरोदे याने महिला पोलीस कर्मचार्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सरोदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तरीदेखील अद्याप त्याला निलंबित करण्यात आले नसल्याने पोलीस दलात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचार्याला तात्काळ निलंबित केले जाते; मात्र सरोदे याच्याबाबत अद्याप निलंबनाची कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलीस अधीक्षक यांचा स्टेनो म्हणून काम पाहत असल्यामुळेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई होत नसल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सरोदे याने अर्जदार भाऊसाहेब शिंदे याला हाताला धरून महिला पोलीस कर्मचार्याशी गैरवर्तन केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिला पोलीस कर्मचार्याने मंगळवारी (27 जानेवारी) रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्या आधारे पोलीस कर्मचारी दीपक सरोदे व भाऊसाहेब शिंदे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या स्टेनोचे पद सध्या रिक्त असून, स्टेनोचे काम सरोदे पाहत होता. या पदाचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः महिला पोलीस कर्मचार्याचा वारंवार छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. छळ असह्य झाल्यानंतर पीडित महिला पोलीस कर्मचार्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रियांका आठरे यांच्याकडे चौकशीचे आदेश देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर सरोदे याच्याकडून स्टेनोचे कामकाज काढून घेण्यात आले असून, बदली झालेल्या ठिकाणी त्याला कार्यमुक्त करण्यात आले आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नसल्याने पोलीस दलात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या जवळ काम करत असल्यामुळे सरोदे याच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही, अशी चर्चा सुरू असून, या प्रकरणी पोलीस अधीक्षक घार्गे यांच्याशी संपर्क केला असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ऐवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.




