अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
हरविलेल्या व अपहरण केलेल्या बालकांच्या व बेपत्ता पुरूष, महिलांच्या संदर्भात ‘ऑपरेशन मुस्कान- 13’ ही विशेष शोधमोहीम 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविली जाणार आहे. याचदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील हरविलेले व पळविलेले बालके तसेच बेपत्ता महिला व पुरूषांचा शोध घेण्यात येणार आहे.
राज्यभरात ‘ऑपरेशन मुस्कान- 13’ ही मोहीम सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यात देखील पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामार्फत ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथक हे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना भेट देऊन सदर मोहिमेबाबत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना समक्ष भेटून संबंधित मोहिमेबाबत माहिती देणार आहेत.
तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे आपल्या पोलीस ठाणे स्तरावर या मोहिमेसाठी एक अधिकारी व तीन पोलीस अंमलदार असे पथक तयार करून त्यांच्याकडून ‘ऑपरेशन मुस्कान- 13’ व्दारे हरविलेले व पळविलेले अल्पवयीन मुले- मुली तसेच रेकॉर्ड व्यतिरिक्त रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळ, रुग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले, बेपत्ता महिला व पुरूष यांचा प्रभावीपणे शोध घेतला जाणार आहे.
समन्वयाने राबविणार मोहीम
अशासकीय संस्था, बालगृह, बालकल्याण समिती, जिल्हा बालसुरक्षा कक्ष यांच्या समन्वयाने पोलीस ही मोहीम राबविणार आहेत. अधीक्षक ओला, अप्पर अधीक्षक खैरे, पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस अंमलदार एस. ए. सय्यद, महिला पोलीस अंमलदार ए. आर. काळे, ए. के. पवार, सी. टी. रांधवन, चालक पोलीस अंमलदार एस. एस. काळे यांचे पथक ही मोहीम राबविण्यासाठी काम करत आहेत.