अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीत निवडणूक होणार्या जिल्ह्यातील एक हजार 223 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण ग्रामविकास विभागाने 5 मार्च रोजी निश्चित केले आहे. यानुसार तालुकानिहाय आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असून, प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी लवकरच ईश्वरी चिठ्ठ्या काढण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील एक हजार 223 ग्रामपंचायत पैकी 624 ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. यात 312 ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या हाती येणार आहे. 330 ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित राहणार असून, यात 165 महिलांना संधी मिळणार आहे, तर 119 ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण राहणार असून, 60 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार आहे. तसेच 150 ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण राहणार असून, यात 75 महिला सरपंचांना संधी असणार आहे.
पुढील पाच वर्षांचे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामविकास विभागाला प्रवर्गनिहाय टक्केवारी आणि लोकसंख्येचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात सादर केला होता. 2011 च्या जनगणनेनुसार सादर केलेल्या अहवालात जिल्ह्यात 36 लाख 53 हजार 339 ग्रामीण लोकसंख्या असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. यात 8 लाख 27 हजार 150 ओबीसींची लोकसंख्या असून, त्यांची एकूण लोकसंख्येशी टक्केवारी 22.64 इतकी आहे. तसेच अनुसूचित जातीची 4 लाख 47 हजार 695 इतकी लोकसंख्या असून, त्यांची टक्केवारी 12.25 आहे. तर 3 लाख 55 हजार 374 अनुसूचित जमातीची लोकसंख्या असून, त्याची टक्केवारी 9.73 टक्के असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
7 ग्रामपंचायतीच्या आरक्षणात सुधारणा
जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने आरक्षणात सुधारणा करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गातील या 7 जागांचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात करण्यात आला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ, शिबलापुर, वडगाव पान, नगर तालुक्यातील हमीदपुर, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, पाथर्डी तालुक्यातील भिलवडे, शेवगाव तालुक्यातील आव्हाणे खुर्द येथील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.