Wednesday, April 8, 2026
HomeनगरAhilyanagar : हार्वेस्टरद्वारे ऊस कापणीमुळे उत्पादनात घट नाही

Ahilyanagar : हार्वेस्टरद्वारे ऊस कापणीमुळे उत्पादनात घट नाही

राष्ट्रीय साखर महासंघाचा दावा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रति एकर सुमारे 15 टन उस उत्पादनात घट होते, अशी विनाकारण चर्चा घडवून आणण्यात येत आहे. हावेर्र्स्टर मशीनद्वारे उसाची कापणी केल्यास उत्पादनात घट होत नाही, असा दावा राष्ट्रीय साखर महासंघाकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती देताना राष्ट्रीय साखर संघाकडून सांगण्यात आले की, उसाचे उत्पादन हे उसाची जात, शेती पद्धती, मातीची सुपिकता, सिंचन व्यवस्था व हवामान परिस्थिती यावर अवलंबून असते. कापणीची पद्धत हाताने किंवा यंत्राद्वारे जैविक उत्पादनावर कोणताही परिणाम करत नाही. कारण कापणी ही केवळ आधीच तयार झालेला उस तोडण्याची प्रक्रिया आहे. हार्वेस्टरमुळे उत्पादनात घट झाल्याचे जे सांगितले जाते, ती प्रत्यक्षात कापणी दरम्यान होणारी हानी केवळ शेतजमीन समतल नसणे, शिफारसीनुसार ओळीतील अंतर नसणे, उस आडवा पडलेला असणे, बेस कटरची उंची चुकीची असणे, अपुरी ओलावा स्थिती आणि प्रशिक्षित ऑपरेटरचा अभाव यांचा समावेश आहे.

ही सर्व कारणे व्यवस्थापनाशी संबंधित असून हार्वेस्टर तंत्रज्ञानातील दोष नाहीत. राज्य कृषी विद्यापीठे व महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या अभ्यासानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन असल्यास हार्वेस्टरद्वारे कापणी करताना होणारी हानी साधारणतः 2 ते 5 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहते, जी हाताने केलेल्या कापणी इतकीच आहे. प्रति एकर 15 टन हेक्टरी सुमारे 37 टन उत्पादन घट होणे हे वैज्ञानिकदृष्ट्या अवास्तव व अप्रमाणित आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा होणारा वाढता वापर आता अटळ आहे. तंत्रज्ञान आणि यंत्राच्या वापरामुळे पिकाचे नुकसान होते, असे एकवेळ मान्य केले, तरी त्याला पर्याय तंत्रज्ञानच आहे, त्यात तांत्रिक बदल भविष्यात होत जाणार.

पण काही माध्यमात प्रकशित झालेल्या बातम्यांनी तंत्रज्ञानाला बोल लावला आहे. यामुळे उस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. जे साखर कारखानदारीला घातक ठरू शकते. शेतकरी व नागरिकांनी अशा विषयांवर वैज्ञानिक व प्रमाणित माहितीवर आधारित निष्कर्ष काढावेत, असे आवाहन नवी दिल्ली स्थित नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्टरीज लिमिटेड या राष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या संस्थेने सर्व सहकारी साखर कारखाने आणि शेतकर्‍यांना केले आहे.

ब्राजील, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये 95 ते 100 टक्के यांत्रिक कापणी केली जाते. आणि तरीही तेथे उस उत्पादन व साखर उतारा हा भारतापेक्षा अधिक आहे, हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. म्हणून हार्वेस्टर ही श्रम बचत, वेळेवर कापणी करणारे व शाश्वत तंत्रज्ञान आहे. योग्य शेततयारी, योग्य पीक रचना आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असल्यास यांत्रिक कापणी मुळे उत्पादनात कोणतीही घट होत नाही.

ताज्या बातम्या

MP Bhaskar Bhagare : खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका; खासदार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik देशातील शेतकरी (Farmer) सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून, १ एप्रिलपासून खतांच्या दरात झालेल्या वाढीमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर...