अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) राज्यातील शाळांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया राबविण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये केलेल्या शाळा मुल्यांकनात राज्यातील 429 शाळांनी अ ही सर्वोच्च श्रेणी मिळवली आहे. यात नगर जिल्ह्यातील 12 शाळांना अ श्रेणी मिळाली आहे. या शाळांचा गौरव आता संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व शाळांचे मुल्यांकन करण्यासाठी एससीईआरटीत शाळा मानक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुल्यांकनासाठी शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार शाळांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया 2024-25मध्ये सुरू करण्यात आली. त्यात शाळांचे स्वयंमुल्यांकन आणि बाह्य मुल्यांकन अशा दोन टप्प्यांत ही प्रक्रिया राबविण्यात येते. 2024-25 मध्ये राज्यातील एक लाख दोन हजार 675 शाळांनी ऑनलाइनद्वारे स्वयंमुल्यांकन केले. या मुल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणार्या शाळांपैकी 2025-26 मध्ये 10 हजार 712 शाळांची बाह्य मुल्यांकनासाठी निवड करण्यात आली होती.
यापैकी 10 हजार 644 शाळांचे बाह्य मुल्यांकन पूर्ण झाले आहे. बाह्य मुल्यांकनात नगर जिल्ह्यातील 12 शाळांना अ श्रेणी मिळाली आहे. या प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित आणि स्वयं-अर्थसहाय्यित अशा सर्व प्रकारच्या शाळांचा सहभाग होता. स्वयंमुल्यांकनानंतर अ प्लस श्रेणीस पात्र ठरलेल्या शाळांचे बाह्य मुल्यांकन एससीईआरटीमार्फत नियुक्त समित्यांद्वारे करण्यात आले. या समित्यांमध्ये विस्तार अधिकारी किंवा केंद्रप्रमुख पथक प्रमुख म्हणून कार्यरत होते.
शाळांच्या मुल्यांकनात शाळांची कामगिरी शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा, पायाभूत सुविधा, शाळेतील कुशल मनुष्यबळ या निकषांवर तपासण्यात आली. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे 2025-26 मध्ये स्वयंमुल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर आवश्यक लिंक 27 फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व शाळांचे स्वयंमुल्यांकन पूर्ण करणे आवश्यक आहे, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
या शाळांना मिळाले अ श्रेणी
प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर, राहाता. महेश मुनोत विद्यालय वांबोरी, राहुरी. नुतन मराठी नंबर 2, राहुरी. जिल्हा परिषद शाळा परिट वाडी, कर्जत. जिल्हा परिषद शाळा सोराळा, जामखेड. ल.ना. हौशिंग हायस्कूल, जामखेड. न्यू इग्लिंश स्कूल, प्रिंपरी निर्मळ, सावित्रिबाई फुले विद्यापिठ, राहुरी. जिल्हा परिषद शाळा संवस्सर, के.बी. रोहमारे ज्युनिअर कॉलेज कोपरगाव. जिल्हा परिषद शाळा डाऊच, कोपरगाव.





