अहिल्यानगर | प्रतिनिधी | Ahilyanagar
माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काल रविवारी झालेल्या मतदानाला 94 टक्के प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीची प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांचे नेतृत्वाखाली 250 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. यासह राखीव कर्मचारी यावेळी उपस्थित ठेवण्यात आले आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून, पहिल्या टप्प्यात ३१ टेबलांवर सर्वसाधारण गटातील १६ जागांची मतमोजणी केली जात आहे. साधारण दुपारी चारनंतर निवडणुकीचा कल हाती येणार असून सायंकाळी सहापर्यंत मतमोजणी पूर्ण होणार असल्याचे सहकार निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यातील सुमारे दहा हजार माध्यमिक शिक्षकांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणार्या माध्यमिक शिक्षक सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत शांततेत पार पडली. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे राजकारण सोसायटीच्या निवडणुकीच्यानिमित्ताने ढवळून निघाले.
यंदा पहिल्यांदा ही निवडणूक अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून शिक्षक संघटनांनी निवडणुकीच्या काळात एकमेकांवर जाहीर आरोप करण्याचे टाळत ही निवडणूक त्यांच्या वर्तुळापर्यंत सिमीत ठेवण्यात यश मिळवले. यामुळे यंदा माध्यमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक मतदानापर्यंत शांततेत पार पडली आहे.