अहिल्यानगर | सचिन दसपुते| Ahilyanagar
अहिल्यानगर तालुका सध्या रस्ता लुटीच्या घटनांमुळे चर्चेत आला आहे. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील चास शिवार वाहनचालकांसाठी लुटीचे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. शेतकर्यांच्या साहित्याची चोरी, दिवसा-रात्री होणार्या घरफोड्या, धारदार शस्त्रांनी हल्ला करून प्रवाशांची लूट अशा घटनांची मालिका सुरू आहे. मात्र यावर ठोस कारवाई करण्याऐवजी तालुका पोलीस केवळ एखादी दुसरी कारवाई करून ‘चमकोगिरी’ करण्यात पटाईत असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिक व प्रवाशांना सुरक्षितता देण्यात तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अपयशी ठरत असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ अधिकार्यांसमोर कामगिरी दाखविण्याचा आव आणण्यात पोलीस गुंतले आहेत. नागरिक मात्र असुरक्षितच असल्याने, प्रभारी अधिकार्यांना पाठीशी घालणार्या वरिष्ठांविषयी रोष वाढत चालला आहे.
गेल्या 15 दिवसांत महामार्गावरील चास, अरणगाव व निमगाव वाघा परिसरात जबरी चोरीच्या तीन घटना घडल्या. धारदार शस्त्रांनी हल्ला करून कुटुंबीयांचे दागिने, रोकड लुटण्यात आली. निमगाव वाघा येथे दोन कुटुंबांवर चोरट्यांनी प्राणघात हल्ला केला. किरकोळ चोरी, दिवसा-रात्रीच्या घरफोड्या, गटांमधील हाणामार्या आणि व्यापार्यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मार्चपासून जूनपर्यंतच्या काळात तर दरोडे, मारहाण, घरफोड्या, दागिने व रोकड चोरी अशा घटनांची मालिका घडली. यातील काही प्रकरणाचा प्रभावी तपास लागलेला नाही. गुन्हेगार टोळ्या मोकाट, पोलीस मात्र निष्क्रिय – हे चित्र धक्कादायक आहे. मार्च महिन्यात जालना जिल्ह्यातील एका कुटुंबाला मारहाण करून सात तोळ्यांचे दागिने लुटले गेले. एप्रिलमध्ये बीड जिल्ह्यातील एका तरूणाला कामरगाव शिवारात मारहाण करून लुटण्यात आले.
याच महिन्यात वाटेफळ शिवारात दोघा भावांवर प्राणघातक हल्ला झाला. मे महिन्यात चिंचोडी पाटील शिवारात बीड जिल्ह्यातील तरूणाची रोकड व मोबाईल लुटला गेला. जूनमध्ये सारोळा बध्दी येथे घरफोडी करून सोन्याचे दागिने व मोठा ऐवज लंपास करण्यात आला. या सर्व घटनांवरून तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तालुका पोलिसांच्या कामाचा आढावा घेणे अत्यावश्यक झाले आहे. आंबीलवाडी शिवारात बनावट नोटा पकडल्यानंतर तालुका पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज येथील बनावट नोटांचा कारखाना उध्दवस्त केला. मात्र या कारखान्याचा मास्टरमाईंड अंबादास ससाणे अजूनही मोकाट फिरतो आहे.
वारंवार या गुन्ह्यात सामील असूनही त्याला का अटक केली नाही, याचे उत्तर कोणी देत नाही. मोठा गुन्हा उघडकीस आल्यानंतरही सूत्रधारावर कारवाई न केल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. बनावट नोटा उघडकीस आणण्याची कामगिरी केल्यानंतर वरिष्ठांनी तालुका पोलिसांचे कौतुक केले. मात्र या नोटांचा मास्टरमाईंड ससाणे अजूनही गजाआड झाला नाही याचा वरिष्ठांनाही विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. वारंवार या गुन्ह्यात सहभागी असूनही त्याला अटक न केल्याने उलटसुलट चर्चा रंगली आहे. पोलिसांनी मोठा कारखाना उध्दवस्त करूनदेखील सूत्रधाराला पकडले नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अवैध धंद्यांना पोलिसांचा वरदहस्त ?
तालुक्यातील नेप्ती, वाळकी, साकत, निमगाव वाघा, खंडाळा आदी गावांमध्ये हातभट्टीचा धुमाकूळ आहे. यावर कारवाई होताना दिसत नाही. गुटखा, गांजाची वाहतूक देखील तालुका हद्दीतून सुरू असून याची माहिती पोलिसांना असूनही कारवाई होत नाही. अवैध धंद्यांना पोलिसांचे छुपे आश्रय असल्याची चर्चा आहे. परिणामी तालुक्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिक असुरक्षित होत असून, पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. तालुका पोलिसांचे अपयश झाकले जाणार का, की प्रभारी अधिकार्यांवर खरोखरच शिस्तभंगाची कारवाई होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वरिष्ठांचा आंधळा पाठिंबा
गावागावात चोर्या, महामार्गावर दरोडे, नागरिकांना शस्त्राच्या धाकाने लुटणे यामुळे अहिल्यानगर तालुका गुन्हेगारीच्या गर्तेत अडकला आहे. मात्र हे सर्व होत असताना तालुका पोलीस ठाणे फक्त ‘दाखवायची कारवाई’ करण्यात रमले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असताना पोलिसांचा कारभार बेफिकीर, तर वरिष्ठांचा आंधळा पाठिंबा नागरिकांच्या रोषाला आमंत्रण देतो आहे. तालुका पोलिसांची वास्तविक कामगिरी शून्य, तरीही वरिष्ठ अधिकार्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे. नागरिक मात्र दररोज भीतीत जगत आहेत. रस्त्यावर पडले की लुटले जाणार, घर सोडले की फोडले जाणार – अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.





