Friday, April 25, 2025
HomeनगरAhilyanagar Teachers Society Election : माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये 'स्वाभिमानी परिवर्तन'

Ahilyanagar Teachers Society Election : माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये ‘स्वाभिमानी परिवर्तन’

अहिल्यानगर | प्रतिनिधी | Ahilyanagar

वरवर चुरशीच्या वाटणार्‍या मात्र निवडणुकीच्या निकालानंतर एकतर्फी लढत झालेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने सत्ताधारी पुरोगामी मंडळाचा धुव्वा उडवला. मतमोजणीनंतर माध्यमिक शिक्षक सोसायटीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे 21 संचालक मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. यामुळे सोसायटीवर गेल्या 22 वर्षांपासून असलेली प्रा. भाऊसाहेब कचरे यांची सत्ता संपुष्टात आली असून खर्‍याअर्थाने माध्यमिक शिक्षक सभासदांनी प्रा. कचरे यांना सोसायटीच्या राजकारणातून सेवानिवृत्त केले असल्याची भावना शिक्षक सभासदांमधून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत झालेल्या 8 हजार 635 मतदानापैकी सर्वाधिक मते विद्यमान संचालक आप्पासाहेब शिंदे यांना सर्वसाधारण प्रवर्गातून 5 हजार 230 मिळालेली आहेत. त्याच्या खालोखाल संचालक बाबासाहेब बोडखे यांना एनटी मतदारसंघातून 5 हजार 120 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत परिवर्तन मंडळाने सत्ताधारी मंडळाचा 500 हून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला आहे. दरम्यान, दुपारी चारपर्यंत निकाल स्पष्ट होताच परिवर्तन मंडळाच्या शिक्षक सभासद आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. यावेळी पुरोगामी मंडळाच्या विरोधात तर परिवर्तन मंडळाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. नगर शहराजवळील कल्याण रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पार पडली.

गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जिल्ह्यात माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीच रणधुमाळी सुरू होती. या निवडणुकीत सत्ताधारी गटासह विरोध गटाने मुक्तहस्ताने खर्च केला. रविवारी मतदान झाल्यानंतर सत्ताधारी पुरोगामी गटाच्या ताब्यातून यंदा सत्ता निसटणार अशी कुजबुज सुरू झाली होती. मात्र, अखेरपर्यंत आपणच सत्तेत राहणार असा आशावाद सत्ताधारी पुरोगामी गटाच्यावतीने व्यक्त करण्यात येत होता. मात्र, मतमोजणीत सत्ताधारी गटाचा आत्मविश्वास पोकळ ठरल्याचे दिसून आले. यंदा पहिल्यांदा माध्यमिक शिक्षक सोयायटीच्या राजकारणात सत्ताधारी प्रा. कचरे यांच्या विरोधात शिक्षकांच्या राजकारणातील सर्व शिक्षक संघटना आणि गट एकत्र आले होते. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सोसायटी कचरे गटाच्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा चंग बांधला होता. त्यात त्यांना यश आले आहे. काल दुपारी सर्वप्रथम सर्वसाधारण प्रवर्गातील 16 जागांचा निकाल हाती आला. यात स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने बाजी मारल्याचे दिसून आले. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात परिवर्तन मंडळाचे उमेदवारी विजयी झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

प्रा. कचरे सोसायटीच्या राजकारणातून बाद
2003 मध्ये तत्कालीन नेता सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी सोसायटीच्या राजकारणातून बाजूला व्हावे, असा मुद्दा पुढे करत सहकार मंडळाच्या विरोधात बंड करत प्रा. कचरे यांनी पुरोगामी मंडळ स्थापन करत सोसायटी ताब्यात घेतली. त्यानंतर सलग 22 वर्षे ही संस्था प्रा. कचरे यांच्या ताब्यात होती. दोन वर्षापूर्वी कचरे हे स्वत: माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही सोसायटीच्या राजकारणात सक्रिय होते. यंदा पुरागामी मंडळाचे नेतृत्व करत त्यांनी उमेदवार उभे केले. त्यांच्या मंडळात त्यांनी दोन जुने संचालक वगळता 19 नवीन चेहर्‍यांना संधी दिली. मात्र, ज्या मुद्द्यावर कचरे यांनी 2003 ला बंड केले होते. त्याच सेवानिवृत्तीच्या मुद्द्यावर विरोधकांनी त्यांना घेरत त्यांना आता खर्‍याअर्थाने सोसायटीच्या राजकारणातून सेवानिवृत्त केले असल्याची भावना अनेकांनी मतमोजणीच्या निकालानंतर व्यक्त केली.

विरोधकांची वज्रमुठ ठरली वरचढ
यंदाच्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी कचरे यांच्या विरोधात माध्यमिक शिक्षकांच्या राजकारणातील सर्वसंघटना एकटवल्या होत्या. त्यांनी सर्वांनी एकत्र येत काहीही करून कचरे यांचा पराभव करण्याचा निर्णय घेतला होता. हा मुद्दा प्रमुख्याने सभासदांसमोर लावून धरत त्याचे मतदानात रुपांतर करण्यात यशस्वी झाल्याने कचरे गटाचा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. या निवडणुकीत संचालक आप्पासाहेब शिंदे, दत्तात्रय नारळे आणि सुनील पंडीत यांनी स्वाभिमानी परिवर्तनचे नेतृत्व केले. या शिवाय प्रचारादरम्यान कचरे गटाचे विद्यमान सात संचालकांनी कचरे यांची साथ सोडत विरोधत मंडळासोबत जाण्याचा निर्णय घेतला. संस्थेचे मागील वर्षीच्या लेखा परिक्षणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सभासदापर्यंत पोहचवण्यात परिवर्तन मंडळ यशस्वी झाल्याने सत्ताधारी गटाचा मोठा पराभव झाला आहे.

परिवर्तनचा पहिला चेअरमन ?
माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये दोन दशकांहून अधिक काळानंतर सत्ता परिवर्तन झाले आहे. यामुळे यंदाच्या विजयी स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा पहिला चेअरमन कोण होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोसायटीच्या राजकारणात संचालक आप्पासाहेब शिंदे गेल्या 20 वर्षापासून एकाकी संघर्ष करत होते. मागील वेळी त्यांनी कचरे यांचे वर्चस्व असतांना स्वत:सह पाच संचालक निवडून आणले होते. यंदा देखील त्यांनी मोठे परिश्रम घेत सोसायटीवर वर्चस्व मिळले असून त्यांच्यासह अन्य काही ज्येष्ठ संचालक चेअरमन पदाच्या स्पर्धेत असून यातून चेअरमन पदावर कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

आमचे नेते प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्यावर संस्थेत हस्तक्षेपाचा आरोप करण्यात आला. सेवानिवृत्तांचा संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप वाढतोय असे वारंवार विरोधकांनी मतदारांवर बिंबवले. उमेदवारी वाटप करतांना नाराजी वाढली. जुने-नवे असा ताळमेळ घालताना अडचणी झाल्या. आता संस्थेचा आर्थिक लौकिक टिकवणे, कर्जाचा व्याजदर स्थिर ठेवणे व ठेवीदारांचा विश्वास टिकवणे, हे नव्या सत्ताधार्‍यांसमोर मोठे असणार आहे.
– धनजंय म्हस्के (नेते, पुरोगामी सहकार मंडळ).

सभासदांनी निवडणूक हातात घेतली होती. सत्ताधार्‍यांच्या एकाधिकारशाहीला सभासद कंटाळले होते. आम्ही शिक्षकांसाठी संघर्ष करणारे उमेदवार रिंगणात उतरवले. सर्व विरोधक एकत्र आले आणि तिसर्‍या आघाडीचा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडला. सत्ताधार्‍याचे 7 संचालक आमच्या सोबत आले. यामुळे सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवला.
– आप्पासाहेब शिंदे (नेते, स्वाभिमानी परिवर्तन मंडळ).

विजयी उमेदवार
सर्वसाधारण मतदारसंघ – बाजीराव अनभुले, राजेंद्र कोतकर, अतुल कोताडे, सुधीर कानवडे, संभाजी गाडे, बाळाजी गायकवाड, उमेश गुंजाळ, आप्पासाहेब जगताप, सुनील दानवे, किशोर धुमाळ, विजय पठारे, छबू फुंदे, साहेबराव रक्टे, शिवाजी लवांडे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे.
महिला मतदारसंघ – वर्षा खिल्लारी, वैशाली दारकुंडे.
अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ – सुरज घाटविसावे.
ओबीसी मतदारसंघ- अर्जुन वाळके.
विमुक्त जाती मतदारसंघ- बाबासाहेब बोडखे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...