Thursday, September 19, 2024
Homeनाशिकअहिरे दाम्पत्याची ग्रामस्थांकडून मिरवणूक

अहिरे दाम्पत्याची ग्रामस्थांकडून मिरवणूक

पंढरपुरला विठ्ठलाच्या महापूजेचा मिळाला होता मान

- Advertisement -

अंबासन । वार्ताहर Ambasan

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बागलाण तालुक्याला पहिल्यांदाच पंढरपूर येथे पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळालेले येथील भाजीपाला विक्रेते व अल्पभूधारक शेतकरी बाळकृष्ण शंकर अहिरे व पत्नी आशाबाई अहिरे यांचे गावातील शिवतीर्थावर आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत गावकर्‍यांनी स्वागत केले.

शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व वारकर्‍यांनी टाळ-मृदुंगात विठ्ठलनामाच्या गजरात गावातून सजवलेल्या वाहनातून अहिरे दाम्पत्याची मिरवणूक काढण्यात आली.

पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आणि माघारी फिरायचे हा पंधरा वर्षांपासून भाजीपाला विक्रेते बाळकृष्ण अहिरे यांचा नित्यनियम. विठ्ठलाच्या नामस्मरणात रममाण झालेले दाम्पत्य 19 तास रांगेत दर्शनासाठी उभे असतानाच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शासकीय पूजेचा मान मिळाल्यानंतर अहिरे दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

पंढरपुरात पूजेचा मान मिळाल्याने अंबासनकरांची मान नव्हे तर जिल्ह्याची मान उंचावल्याची भावना वारकर्‍यांनी व्यक्त केली. सकाळी 10 वाजेच्या सुमारास येथील शिवतीर्थावर अहिरे दाम्पत्यासह वारीला गेलेल्या 11 वारकर्‍यांचे स्वागत फटाक्यांची आतषबाजी, लेझीम पथक तसेच विठ्ठलाच्या नामस्मरणात करण्यात आले.

राज्य वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष श्रावण महाराज यांच्यासह आमदार दिलीप बोरसे, प्रांत अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार दीपक चावडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य यतिंद्र पगार, डॉ. तुषार शेवाळे, तलाठी जयप्रकाश सोनवणे, डॉ. विलास बच्छाव, सरपंच राजसबाई गरूड, ग्रामविकास अधिकारी साहेबराव कोर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तहसीलदार दीपक चावडे, आमदार दिलीप बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दादाजी अहिरे व अ‍ॅड. प्रवीण बागुल यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या