नवी दिल्ली | New Delhi
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे (Air India) १७१ हे विमान अहमदाबादहून (Ahmedabad) लंडनला जात असताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या विमान दुर्घटनेत आतापर्यंत ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अहमदाबाद विमानतळाहून लंडनच्या दिशेला उड्डाण केलेल्या विमानाचा उड्डाणानंतर अवघ्या १५ किमी अंतरावर मोठा अपघात घडला. अहमदाबादमध्ये मेघानी परिसरात हवेत झेपावलेलं विमान अचानक खाली कोसळले. यामुळे मोठी दुर्घटना घडली. या विमानात २४२ प्रवासी होते. त्यामध्ये दोन नवजात बालकांचादेखील समावेश होता. या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या विमानात प्रवास करणाऱ्यांमध्ये भारतासह ब्रिटीश, नागरीक, पोर्तुगीज आणि कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता.
View this post on Instagram
या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश आणि कॅनडाच्या एका नागरिकाचा समावेश आहे. या विमानाने नुकतेच उड्डाण केल्यामुळे विमानाची इंधन टाकी पूर्णपणे भरली होती. या टाकीमध्ये जवळपास सव्वा लाख लीटर इंधन होते. त्यामुळे विमान कोसळताच प्रचंड मोठा स्फोट झाला. विमानाने १ वाजून ३१ मिनिटांनी टेक ऑफ घेतले होते. त्यानंतर १ वाजून ३८ मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल नियंत्रण कक्षाला मिळाला होता. यानंतर हे विमान मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात कोसळले.
दरम्यान, सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. तसेच विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत असल्याचे बोर्डिंग पासमधून स्पष्ट झाले आहे.
बी.जे मेडीकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं विमान
या विमानाचा अपघात इतका भयंकर होता की, अहमदाबादच्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळलं. तेथील हॉस्टेलवर जेवण करणाऱ्या भावी डॉक्टरांना भरल्या ताटावरुन उठवण्याचे काम या दुर्घटनेनं केले.या दुर्घटनेचे काही फोटो समोर आले असून येथील ४५ डॉक्टर जखमी झाल्याची माहिती आहे.
एअर इंडियाकडून हेल्पलाइन नंबर जारी
या अपघातानंतर एअर इंडियाकडून एक हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. एअर इंडियातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रवासी हॉटलाइन क्रमांक १८००५६९१४४४ हा सुरू करण्यात आला आहे. या अपघातातत होरपळलेल्या लोकांना, जखमी प्रवाशांना जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले जात आहे, असे एअर इंडियाने सोशल मीडिया साइट एक्स वरील पोस्टमधये नमूद केलं आहे.




