नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानीनगर परिसरात आज (दि.१२) रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास एअर इंडियाचे (Air India) १७१ हे विमान अहमदाबादहून (Ahmedabad) लंडनला जात असताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे संपूर्ण देश सुन्न झाला असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. या विमान अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएडेट प्रेस या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. मात्र, कुठल्याही भारतीय वृत्तसंस्थेने या घटनेला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे नेमक्या किती प्रवाशांचा या विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आणि किती जीवित व जखमी आहेत, याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
BREAKING: There appear to be no survivors from Air India flight to London that crashed in Ahmedabad, city's police chief tells AP. Follow for live updates. https://t.co/KYkwKeKhRN
— The Associated Press (@AP) June 12, 2025
एअर इंडियाच्या या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश आणि कॅनडाच्या एका नागरिकाचा समावेश आहे. या विमानाने नुकतेच उड्डाण केल्यामुळे विमानाची इंधन टाकी पूर्णपणे भरली होती. या टाकीमध्ये जवळपास सव्वा लाख लीटर इंधन होते. त्यामुळे विमान कोसळताच प्रचंड मोठा स्फोट झाला.
दरम्यान, या घटनेबाबत अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, “अपघातग्रस्त एअर इंडिया एअरलाइन्सच्या विमानात कोणीही वाचले नसल्याचे दिसून येत आहे. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करत होते. ते लंडनला जाणार होते. मात्र, टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानाला एका निवासी भागात अपघात झाला. या विमानात पायलट आणि क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते. विमान अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना वाचवणे खूप कठीण आहे, असे त्यांनी म्हटले.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन?
एअर इंडियाच्या या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) हे देखील होते. त्यांच्या पत्नी अंजली रूपाणी लंडनमध्ये आहेत असून, त्यांना परत आणण्यासाठी विजय रूपाणी लंडनाला जात होते. मात्र, या विमान अपघातात त्यांचेही निधन झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे राज्यसभेचे खासदार परिमल नाथवानी (Parimal Nathwani) यांनी रूपाणी यांचे निधन झाल्याचे ट्विट केले आहे. पंरतु, याबाबत दुसऱ्या कुठल्याही भारतीय संस्थेने अधिकृतपणे रूपाणी यांचे निधन झाल्याचे जाहीर केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या निधनाबाबत अजूनही संभ्रम आहे.




