अहमदनगर | प्रतिनिधी
वीज बिल थकल्यामुळे मार्च 2024 पुर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यातील 30 हजार 885 वीज ग्राहकांच्या प्रकरणांचा निपटारा तडजोडीच्या माध्यमातून लोकअदालतमध्ये आज (शनिवार) करण्यात येणार आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी दिली.
दरम्यान, जिल्हा तथा तालुका विधी सेवा प्राधिकरणाकडून आयोजित लोकअदालत मध्ये दाखलपूर्व असलेली आणि कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेली 30 हजार 885 प्रकरणे 51 कोटी 34 लाख रूपयाच्या तडजोडीसाठी महावितरणने ठेवली आहेत. जिल्ह्यात होणार्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सहभाग नोंदवून तडजोडीने वाद मिटवावा आणि महावितरणच्या व्याज आणि विलंब आकाराच्या माफीचा लाभ घ्यावा असे आवाहनही अधीक्षक अभियंता पवार यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीत सहभाग नोंदविणार्या महावितरणच्या लघुदाब आणि उच्चदाब ग्राहकांना महावितरण अभय योजना 2024 च्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 100 टक्के मुद्दल रक्कम भरणार्या थकबाकीदार ग्राहकांना व्याज आणि विलंब आकाराची माफी मिळणार आहे. सोबत वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या तारखेपासून तर अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
याशिवाय थकबाकीदार ग्राहकांने मुद्दल रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब वर्गवारितील ग्राहकांना 5 टक्के आणि लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांना 10 टक्के अतिरिक्त सवलतीचे प्रावधान आहे. याशिवाय 30 टक्के डाऊन पेमेंट भरून उर्वरित मुद्दल थकबाकी 6 हप्त्यात भरण्याचे आवाहनही करण्यात आले आहेत.
तीन लाख ग्राहकांकडे 377 कोटींची थकबाकी
नगर जिल्ह्यात तीन लाख ग्राहकांकडे 377 कोटी 39 लाख रूपये थकबाकी असून थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शनिवार व रविवारी 28 व 29 सप्टेंबर 2024 या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू असणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार असून या सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.