अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहमदनगर शहर मतदारसंघात शनिवारपासून गृह मतदान प्रक्रियेस (घरबसल्या मतदान) सुरूवात करण्यात आली. शहरात असलेल्या 143 मतदारांपैकी 133 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. गृह मतदान प्रक्रियेच्या शहरातील नोडल अधिकारी तथा महापालिकेच्या उपायुक्त सपना वसावे यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, उर्वरित 10 मतदारांपैकी दोन मतदारांचे निधन झाल्याचे आढळले, तिघे पुणे येथे उपचार घेत असल्याने त्यांचे गृहमतदान होऊ शकले नाही. इतर पाच मतदारांसाठी आज, रविवारी अखेरची संधीसाठी पुन्हा प्रक्रिया राबवली जाईल. मात्र या सहा पैकी कोणी आज मतदान करण्यासाठी उपलब्ध न झाल्यास त्यांना 20 नोव्हेंबरला, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने 85 पेक्षा अधिक वयाचे जेष्ठ नागरिक व दिव्यांग यांच्यासाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे, मात्र त्यासाठी पूर्वसंमती आवश्यक होती. या प्रक्रियेसाठी 143 मतदारांनी लेखी संमती दिली. त्यांच्यासाठी 60 कर्मचार्यांचा समावेश असलेली 12 पथके तैनात करण्यात आली होती. या पथकांना पूर्वप्रशिक्षण देण्यात आले होते. शनिवारी सकाळी साहित्य देऊन त्यांना रवाना करण्यात आले. त्यांच्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसवण्यात आली होती तसेच मार्गिकाही ठरवून देण्यात आल्या होत्या. सकाळी 9 ते सायंकाळी 6 दरम्यान 133 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
या प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले पथक संबंधित मतदाराच्या घरी जाऊन त्याच्या घरात मतदान केंद्र उभारतात व गोपनीय पध्दतीने मतदान घडून आणतात. या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. या मतपत्रिका लगेच ‘स्ट्राँग रूम’ मध्ये जमा केल्या जातात. जिल्ह्यातील इतर मतदारसंघात ही प्रक्रिया 14, 15 व 16 नोव्हेंबरला राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली. त्यासाठी अहिल्यानगर शहर वगळता 2492 मतदार आहेत. त्यासाठी 125 पथके नियुक्त केली आहेत.